महाराष्ट्रातील नामांकीत बँकेच्या अध्यक्षांवर मोठी कारवाई, सहकार आणि राजकीय क्षेत्रात खळबळ
आरबीआयने नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची मान्यता रद्द केल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यानंतर आता बँकींग क्षेत्राशी संबंधित आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील एका नामांकीत बँकेच्या संचालक आणि अध्यक्षांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

परभणी | 23 ऑक्टोबर 2023 : काँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर यांना मोठा धक्का बसला आहे. वरपुडकरांचं परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचं सदस्यत्व अपात्र ठरविण्यात आलं आहे. आमदार वरपुडकर हे परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक तथा अध्यक्ष होते. पण विभागीय सहनिमंत्रकांनी त्यांना अपात्र ठरवलं आहे. विभागीय सहनिमंत्रकांनी वरपुडकरांच्या अपात्रतेचे आदेश दिले आहेत. विभागीय सहनिमंत्रकांच्या या कारवाईमुळे सहकार आणि राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश वरपुडकर जिल्हा बँकेचे थकबाकीदार असल्याच्या कारणाने बँकेचे संचालकत्व अपात्र ठरविले आहे. महाराष्ट्र संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 कअ (1)(फ) आणि (2) नुसार दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परभणी बँकेचे संचालक म्हणून वरपुडकर यांना अपात्र ठरविले आहे.
सुरेश वरपूडकर यांचं अनेक वर्षांपासून बँकेवर वर्चस्व
परभणी जिल्हा बँकेची दोन वर्षांपूर्वी निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत सुरेश वरपूडकर यांच्या पॅनलला 21 पैकी 11 जागांवर विजय मिळाला होता. या निवडणुकीत सुरेश वडपुरकर गटाने भाजप आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या पॅनलचा पराभव केला होता. त्यांच्या पॅनलला 9 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.
परभणी जिल्हा बँकेत सुरेश वरपूडकर यांचं गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व आहे. 2021 च्या निवडणुकीत त्यांच्या गटाने बाजी मारली होती. त्याआधी 2015 च्या निवडणुकीतही त्यांचा विजय झाला होता. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. कारण वरपूडकर आणि बोर्डीकर हे नेते एकाच पॅनलखाली एकत्र आले होते. दोन्ही मातब्बर नेते एकत्र आल्यामुळे त्यांचा विजय झाला होता.
