Uddhav Thackeray: रामाच्या नावाने दुकान उघडलंय काय? उद्धव ठाकरे यांचा भाजपला खोचक टोला
Uddhav Thackeray Parbhani Press: अयोध्येतील राम मंदिर दानपेटीत मोठा अपहार समोर आला आहे. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. परभणीत पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर थेट निशाणा साधाला आहे.

Uddhav Thackeray On Ram Mandir : खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे सध्या विदर्भासह मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. मराठवाड्यातील परभणीत आज कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. खासदार संजय जाधव यांनी नुकतेच पक्षांतर केले आहे. उद्धव सेना सोडून शिंदे सेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. त्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी शड्डू ठोकले आहेत. अक्षदा मंगल कार्यालयात शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राम मंदिरातील दानपेटी अपहारप्रकरणी भाजपला टोला लगावला आहे.
राज्यात कुणीही आनंदी नाही
देशाच्या कोणत्या राज्यात संतोष आहे? कोणत्याच नाही. ज्यावेळी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली होती. तेव्हा माझ्याकडून जे करायचं ते केलं आणि करत होतं. दुर्देवाने गद्दारी करून सरकार पाडलं. त्यांना आमचं सरकार बघवलं नाही. यांना मराठा मराठा झुंजवत ठेवायचं आहे. प्रश्न सोडवायचे नाही. आज पेपर फुटत आहे. खासदार फुटत आहेत. काल टीईटीचा पेपर फुटला. अंधाधूंद चालली आहे. राज्यात कोणीही आनंदी दिसत नाहीये, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
रामाच्या नावाने दुकान उघडलंय काय?
राम मंदिराचा धंदा केला. मी सारखा हा शब्द वापरेल. राम मंदिर हे आमचं दैवत आहे. श्रद्धास्थान आहे. मंदिर नाही, त्यांनी दुकान उघडलं. रामाच्या नावाने यांनी धंदा सुरू केला आहे. कारसेवकांनी जीव दिला. घरदार सोडलं. गोध्रा झाला. हे सर्व कशासाठी झालं. राम मंदिर उभं राहावं म्हणून ना. पण त्याच्या आडून जे धंदे चालले आहेत. ते घृणास्पद आहे. मंदिर वही बनायेंगे म्हणायचे. ते कशासाठी हे आता कळत आहे. यांना धंदा करायचा होता, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
बाळासाहेबांनीही अयोध्येचा दौरा केला होता. प्रमोद महाजन सोबत होते. आता जे झालंय ते हिंदुत्वाची गद्दारी आहे. आमदार खासदार फोडणं यावर मतदार बघतील. पण राम मंदिरातून जी चोरी झाली हे पाहिलं तर हिंदू आणि हिंदुत्वाशी केलेली गद्दारी आहे, अशी चौफेर टीका उद्धव ठाकरे यांनी परभणीतील पत्रकार परिषदेत केली.