Washim : लस न घेणाऱ्यांना प्रशासनाचा दणका, 38 जणांकडून दंड वसूल, दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई होणार

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या मार्गदर्शनात जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना लस न घेतलेल्या नागरीकांना दंड आकारण्याचे निर्देश दिले गेले आहेत.

Washim : लस न घेणाऱ्यांना प्रशासनाचा दणका, 38 जणांकडून दंड वसूल, दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई होणार
संग्रहित छायाचित्र.

वाशिम: कोरोनाचा (Corona) संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहीम (Corona Vaccination) वेगाने राबविण्यात येत आहे. वाशिम (Washim) जिल्हा प्रशासनाने विविध यंत्रणांना सोबत घेवून सर्व पात्र व्यक्तींचे 100 टक्के लसीकरण करण्याचे नियोजन केले आहे. तर दुसरीकडे काही व्यक्ती गैरसमजूतीमुळे लस घेण्यापासून दूर आहेत. पात्र सर्वच व्यक्तीचे लसीकरण करणे शासनाने बंधनकारक केले आहे. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या मार्गदर्शनात जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना लस न घेतलेल्या नागरीकांना दंड आकारण्याचे निर्देश दिले गेले आहेत. वाशिम जिल्ह्यात महसूल यंत्रणेनं पहिल्या दिवशी 38 व्यक्तींकडून 16 हजार 300 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

नेमका किती दंड वसूल झाला?

लसीकरणाबाबत दंड केलेल्या 38 प्रकरणी एकूण 16 हजार 300 रुपये दंड आकारण्यात आला. उपविभागीय अधिकारी मंगरुळपीर यांनी 15 प्रकरणी 3 हजार रुपये दंड, उपविभागीय अधिकारी कारंजा यांनी 7 प्रकरणी 3 हजार 500 रुपये दंड, वाशिम तहसिलदार यांनी 5 प्रकरणी 5 हजार 500 रुपये दंड, रिसोड तहसिलदार यांनी 2 प्रकरणी 1 हजार रुपये दंड, मंगरुळपीर तहसिलदार यांनी 4 प्रकरणी 800 रुपये दंड आणि कारंजा तहसिलदार यांनी 5 प्रकरणी 2 हजार 500 रुपयाचा दंड लस न घेतलेल्या व्यक्तीकडून वसूल केला. यापुढेही लस न घेतलेल्या व्यक्ती आढळून आल्यास त्यांच्यावर निश्चितपणे दंड आकारला जाणार आहे.

दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई होणार

मानोरा तालुक्यातील कुपटा येथे नागरिकांना लस घेण्यापासून रोखणारे व जाणून बुजून लसीकरणाबाबत अफवा पसरविणारे दोन व्यक्ती निदर्शनास आले. तहसिलदार मानोरा यांनी त्या दोन व्यक्तींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी सुध्दा त्या दोन व्यक्तींनी ऐकले नाही. त्या दोन व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश कारंजा उपविभागीय अधिकारी राहूल जाधव यांनी पोलिसांना दिले आहेत. यापुढे लसीकरणाबाबत अफवा पसरविणारे तसेच लस घेण्यापासून रोखणारे जे व्यक्ती आढळून येतील. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून कलम 353 अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असतांना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात ओमिक्रॉन या नव्या विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक पात्र नागरीकांनी कोविड लस घेवून आपले आरोग्य सुरक्षित राखावे. तसेच नियमित मास्कचा वापर करणे, सुरक्षित सामाजिक अंतर राखणे आणि हात साबणाने वारंवार स्वच्छ धुणे या त्रिसुत्रीचा वापर नागरीकांनी करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

इतर बातम्या:

प्रेयसीची हत्या, दगड बांधून मृतदेह खाडीत टाकला, विरारमधील खुनाचा पाच दिवसात उलगडा

Mumbai: ओमिक्रॉनवर जालिम उपाय, चाळिशीच्या पुढच्यांना बुस्टर डोसची तयारी

Washim District Administration charge fine those who not take corona preventive vaccine

Published On - 9:25 am, Sat, 4 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI