प्रेयसीची हत्या, दगड बांधून मृतदेह खाडीत टाकला, विरारमधील खुनाचा पाच दिवसात उलगडा

हर्षद आणि रेश्मा या दोघांचे 2019 पासून प्रेमसंबंध होते. याच प्रेमसंबंधातून रेश्मा हिने हर्षदकडे लग्न करण्याचा तगादा लावला होता. यातून त्यांचे नेहमी वादविवाद सुरु होते. लग्न तर करायचे नाहीच, पण प्रेयसीला आपल्या आयुष्यातून संपवायचे असा कट त्याने रचला.

प्रेयसीची हत्या, दगड बांधून मृतदेह खाडीत टाकला, विरारमधील खुनाचा पाच दिवसात उलगडा
आरोपी आणि मयत तरुणी रेश्मा खाडिये (उजवीकडे)

विरार : विरारच्या अर्नाळा परिसरात म्हारंबळपाडा जेट्टीजवळ 5 दिवसांपूर्वी सापडलेल्या तरुणीच्या मृतदेहाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. लग्नाचा तगादा लावत असल्याने प्रियकराने मित्राच्या मदतीने प्रेयसीची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी आरोपी प्रियकरासह त्याच्या एका मित्राला अटक करण्यात आली आहे. विरार गुन्हे कक्ष 3 च्या टीमने ही कामगिरी केली आहे.

रेश्मा प्रकाश खाडिये असे 25 वर्षीय मयत तरुणीचे नाव आहे. ती विरार पूर्व भागातील फुलपाडा येथील रहिवासी होती. तर हर्षद जाऊ पाटील (वय 26 वर्ष) आणि क्रितेश अशोक किणी (वय 28 वर्ष) अशी आरोपींची नावं आहेत. यातील मुख्य आरोपी हर्षद हा मयत तरुणीचा प्रियकर असून क्रितेश हा हर्षदचा मित्र आहे.

काय आहे प्रकरण?

हर्षद आणि रेश्मा या दोघांचे 2019 पासून प्रेमसंबंध होते. याच प्रेमसंबंधातून रेश्मा हिने हर्षदकडे लग्न करण्याचा तगादा लावला होता. यातून त्यांचे नेहमी वादविवाद सुरु होते. लग्न तर करायचे नाहीच, पण प्रेयसीला आपल्या आयुष्यातून संपवायचे असा कट रचून प्रियकर हर्षद याने त्याचा मित्र क्रितेश याला सोबत घेऊन, 24 आणि 25 नोव्हेंबरच्या मध्यरात्री रेश्मा हिला अज्ञातस्थळी बोलावले. खाडी किनारी भेटायला बोलावून त्याच ठिकाणी तिची गळा आवळून हत्या केली होती.

मृतदेहाला 10 किलो वजनाचा दगड बांधला

हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या मृतदेहाला 10 किलो वजनाचा दगड बांधला आणि तिचा मृतदेह बोटीतून नेऊन खाडीत फेकून ते फरार झाले होते. 27 नोव्हेंबर रोजी अर्नाळा म्हारंबल पाडा जेट्टी नं 22 परिसरात मृतदेहाला दगड बांधलेल्या कुजलेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळून आला होता.

मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपी विरोधात हत्या करुन पुरावा नष्ट केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याच्या अनुषंगाने अर्नाळा पोलीस आणि गुन्हे कक्ष 03 अशा दोन स्वतंत्र टीमने तपास केला.

तरुणीच्या प्रेमसंबंधावरुन सुगावा

तपास करत असताना प्रथम मृतदेहाची ओळख पटवून, त्याची माहिती काढली असता मयत तरुणीचे विरार पश्चिम नारंगी येथे राहणारा हर्षद पाटील यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. गुन्हे कक्ष 3 चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख आणि त्यांच्या टीमने हर्षद याला ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने आपल्या मित्राच्या मदतीने ही हत्या केली असल्याचे कबुल केले आहे.

या हत्या प्रकरणात प्रियकर हर्षद आणि त्याचा मित्र क्रितेश या दोघांनाही अटक करुन शुक्रवारी वसई न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील तपास हा अर्नाळा सागरी पोलीस करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

पत्नीच्या हत्या प्रकरणातून जिने जामिनावर सोडवलं, त्याच बहिणीचा भांडणानंतर खून

वडिलांपाठोपाठ लेकही गेला, कृषी पंपाचे कनेक्शन जोडताना खांबावरच शॉक, 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू

जेलमधून संचित सुट्टीवर बाहेर, गावकऱ्याचं घर पेटवणाऱ्या तरुणाला तीन वर्ष सक्तमजुरी

Published On - 9:04 am, Sat, 4 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI