“संपकाळातही अवकाळीचे पंचनामे सुरू”; ‘या’ जिल्हाधिकाऱ्यांनी दिले प्रत्यक्ष पंचनामे करण्याचे आदेश

| Updated on: Mar 20, 2023 | 4:16 PM

परभणी जिल्ह्यात 3 हजार 275 हेक्टरवर नुकसान झाल्याची प्राथमिक प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

संपकाळातही अवकाळीचे पंचनामे सुरू; या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले प्रत्यक्ष पंचनामे करण्याचे आदेश
Follow us on

परभणी : गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक अवकाळी पावसामुळे वाया गेल्याने शेतकरी आता आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांनी तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली होती. मात्र याच काळात शासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करणार कोण असा सवाल उपस्थित केला जात होता.

त्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संपाचा पंचनामा करण्यावर कोणताही परिणाम होणार नाही असे स्पष्ट सांगितले होते.

त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. त्यानंतर आता परभणी जिल्ह्यातही संप चालू असतानाही महसूल कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.

परभणीचे जिल्हाधिकारी ऑंचल गोयल यांनी कर्मचाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिल्याने आता संपकाळातही शासकीय कर्मचारी पंचनामे करत आहेत.

परभणी जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

परभणी जिल्ह्यात 3 हजार 275 हेक्टरवर नुकसान झाल्याची प्राथमिक प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.तर कालपासून पावसाने उघडीप दिल्याने आता नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करत होते.

त्यामुळे आता प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. जिल्हाधिकारी आँचाल गोयल यांनी या पंचनाम्यावर संपाचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे महसूल कर्मचाऱ्यांना परभणी जिल्ह्यातील करडगाव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत.

परभणी जिल्ह्यात पंचनामे सुरू झाल्याने या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता ज्या ज्या परिसरात अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान केले आहे. त्या त्या जिल्ह्यातील शेतीचेही पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली आहे.