FDA ने पार्ले एग्रोच्या गोदामाचे लायसन्स केले रद्द, चेंबूर-वाशीनाकात धडक कारवाई
अन्न आणि औषध प्रशासनाने चेंबुर वाशी नाका परिसरात पार्ले एग्रो गोदामावर छापा टाकली होती. त्यानंतर आता या गोदामाचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त पदी तुकाराम मुंढे आल्यानंतर त्यांनी अन्न भेसळ विरोधात कारवाई सुरु केली आहे. आतापर्यंत अनेक अन्न पदार्थ तयार करणाऱ्या कंपन्यांवर एफडीएच्या पथकाने कारवाई केली आहे. 13 ऑगस्ट रोजी चेंबुर – वाशी नाका येथील पार्ले एग्रोच्या एक्सप्रेस गोदामावर छापा टाकल्यानंतर आता या गोदामाचे लायसन्स पुढील आदेश मिळेपर्यंत रद्द करण्यात आले आहे.
मुंबईतील चेंबूर- वाशीनाका परिसरातील पार्ले ॲग्रोच्या एक्सप्रेस गोदामावर महाराष्ट्र FDA ने केलेल्या कारवाईनंतर या गोदामाचं लायसन्स पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आले आहे. एफडीएच्या या छाप्यात मुदतबाह्य Frooti, Appy Fizz आणि Candy Juice चे साठे आढळले होते. या कारवाईत FDA ने सुमारे 99 हजार 970 रुपयांचा मुदतबाह्य साठा जप्त केला आहे. या कारवाईनंतर गोदाम सील करण्यात आले आहे. गोदामाचे फूड बिझनस परवाना निलंबित करण्यात आला आहे. पुढील आदेशापर्यंत गोदामातून खाद्यपदार्थ किंवा पेयांची विक्री आणि वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता सुरू झालेली ही कारवाई 14 ऑगस्टच्या पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू होती. FDA च्या आठ अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. उत्पादनांच्या वाहतुकीसाठी वापरली जाणारी दोन वाहनेही ताब्यात घेण्यात आली. मुदतबाह्य साठा बाजारात विक्रीसाठी गेला होता की नाही, याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आला आहे.
