सर्वेसर्वा… गँग… डोक्यात हवा… अंजली दमानिया यांची पार्थ पवारांवर सडकून टीका; काय काय म्हणाल्या ?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पार्थ पवारांवर पुन्हा सडकून टीका केली आहे. पार्थ पवारांच्या 'डोक्यात हवा' गेली असून, ते स्वतःला राष्ट्रवादीचे 'सर्वेसर्वा' समजत आहेत, असे दमानिया म्हणाल्या. मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवार मुख्य सूत्रधार असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पार्थ पवारांच्या वागणुकीवरच अंजली दमानिया यांनी बोट ठेवलं आहे. पार्थ पवारांच्या डोक्यात हवा गेली आहे. त्यांची स्वत:ची गँग घेऊन ते फिरत आहेत. अजितदादांच्या नंतर आपणच सर्वेसर्वा आहोत, असं पार्थ पवार यांना वाटतंय, अशा शब्दात अंजली दमानिया यांनी पार्थ पवारांवर शरसंधान साधलं आहे. त्यामुळे दमानिया यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते काय उत्तर देतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अंजली दमानिया मीडियाशी बोलत होत्या.
सध्या पार्थ पवार यांना आपणच एनसीपीचे सर्वेसर्वा आहोत, असं त्याला वाटतं. अजितदादांची जागा घेत असल्याचं त्याला वाटत आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना त्यांचचं औषध पार्थ पवारने पाजलं आहे. पार्थ पवार त्याला हवंय ते करतोय. त्याचीच गँग तो घेऊन फिरतोय. त्याच्या हवा डोक्यात गेली आहे. पटेल आणि तटकरे सारख्यांची नावे पक्षाच्या यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यांना बाहेर ठेवलं असेल तर तेच जाणो. भुजबळांनाही बाहेर ठेवल्याचं ऐकून बरं वाटतंय, असं अंजली दमानिया म्हणाल्या. पार्थ पवारांचं एनसीपीचं राष्ट्रीय गणित पाहतोय. त्यामुळे पक्षात धूसफुस वाढतेय, असा दावाही त्यांनी केला.
झुरळ असल्याचा अभिमान
सरन्यायाधीशांनी दमानिया यांचा उल्लेख झुरळ असा केला होता. त्यावरही त्यांनी भाष्य केलंय. हे विधान ऐकून मला धक्का बसला. मी झूरळ आहे असं ट्विट मी केलंय. सरन्यायाधीश झुरळ म्हणत असतील तर मला अभिमान आहे. सत्ताधारी विचित्र वागतात. हे सगळं वेगळ्या दिशेनं जात आहेत. हे संविधानाच्या विरोधात आहे, त्यांनी माफी मागितली पाहिजे, असं अंजली दमानिया म्हणाल्या.
पार्थ 99 टक्के पार्टनर
व्यवस्थेवर प्रश्न विचारणार नाही का? भ्रष्टाचार का होतोय? ते चुकत आहेत आम्ही नाही. मुंढवा जमीन घोटाळ्याचा मी खुलासा केला. पार्थ पवार त्यात रोवला गेला आहे. पण त्याचं नाव कुठेच नाही. यामागे भाजपचं आणि सुनील तटकरे गँगचं षडयंत्र आहे. सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांचं नाव बाहेर ठेवलं. यानंतर अचानक चार्जशीटमध्ये दिग्विजय पाटील याचं नाव येतं. पार्थ पवार हा मुख्य सुत्रधार आहे. चार्जशीट नक्कीच चुकली आहे. दिग्विजय एक टक्का पार्टनर आहे. तर पार्थ पवार 99 टक्के पार्टनर आहे, असा दावा त्यांनी केला.
कराळेंना निलंबित करा
यावेळी अशोक खरात प्रकरणावरही भाष्य केलं. अशोक खरात प्रकरणात दोन अधिकारी आहेत. आयजी कराळेंवर मोठे आरोप आहेत. हा 400 कोटींचा ट्रान्सपोर्ट फ्रॉड आहे. भांडे पाटीलने खरातला 143 फोन कॉल्स केले होते. कशासाठी? या प्रकरणात आयजी कराळे यांना निलंबित केलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.