PCMC election 2026 : खरा उमेदवार ठरला होता अपक्ष,अखेर मिळाले घड्याळ आणि अधिकाऱ्याची उचलबांगडी

हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चिन्ह वाटपाच्या दिवशी तातडीने सुनावणी घेत राष्ट्रवादी अजितदादा यांच्या उमेदवाराला दिलासा दिला आहे.

PCMC election 2026 : खरा उमेदवार ठरला होता अपक्ष,अखेर मिळाले घड्याळ आणि अधिकाऱ्याची उचलबांगडी
PCMC election 2026
| Updated on: Jan 05, 2026 | 7:37 PM

राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान आहे. राज्यात सर्वच राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. यामुळे राज्यातील वातावरण तापले असतानाच अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या बिनविरोधी उमेदवारात सत्तापक्षाचे उमेदवारांचा भरणा असल्याने टीका होत आहे. त्यात आता पिंपरी-चिंचवड या महानगर पालिकेत सत्ताधारी अजितदादा यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराची एबी फॉर्म गहाळ झाल्याची घटना घडली होती. त्यात आता एका अधिकाऱ्याची उचलबांगडी झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवार गटाची युती आहे. या महानगर पालिकेत अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार जयश्री भोंडवे यांचा अर्ज गहाळ झाला होता. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्याने अर्ज छाननीनंतर त्यांना अपक्ष ठरवले होते. या विरोधात जयश्री भोंडवेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सीसीटीव्ही, व्हिडिओग्राफी, तसेच इतर तांत्रिक पुरावे त्यांनी सादर केले. यात तथ्य असल्याचे पाहून न्यायालयाने निवडणूक आयोगाला हे पुरावे तपासण्यासाठी पालिका आयुक्तांना स्वतंत्र सुनावणीचे आदेश दिले होते.

पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चिन्ह वाटपाच्या दिवशीच तातडीने सुनावणी घेतली. जयश्री भोंडवे यांनी वेळेतचं एबी फॉर्म सादर केला होता. हे हर्डीकर यांच्याही निदर्शनास आले. त्यामुळे हर्डीकर यांनी जयश्री भोंडवे यांचा एबी फॉर्म ग्राह्य धरला. त्यामुळे अर्ज छाननीच्या अंतिम यादीत अपक्ष ठरलेल्या जयश्री भोंडवे यांना चिन्ह वाटपाच्या यादीत ‘घड्याळ चिन्ह दिल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, हा घोळ ज्यांच्यामुळे झाला ते निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटल यांची आता बदली करण्यात आली आहे.

हनुमंत पाटील यांची बदली

या प्रकरणानंतर राष्ट्रवादीच्या जयश्री भोंडवे यांचा एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांच्याकडून गहाळ झाला होता. यात जयश्री भोंडवे यांची काहीही चूक असताना ही पाटील यांनी छाननी वेळी त्यांना अपक्ष उमेदवार ठरवले होते. आता या प्रकरणात कारवाई होत एबी फॉर्म गहाळ करणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांची बदली करण्यात आली आहे.