धक्कादायक, धावत्या बसमध्ये महिलेच्या अंगावर लघुशंका करण्याचा किळसवाणा प्रकार, महाराष्ट्रातील घटना
धावत्या बसमध्ये एक महिलेच्या अंगावर लघुशंका करण्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्रातील ही घटना आहे. महिला सुरक्षेसाठी सरकारने कठोर कायदे बनवले असले तरी महिलांसोबत घडणाऱ्या गुन्ह्यांची संख्या कमी झालेली नाही.

महिला सुरक्षेसाठी सरकारने कठोर कायदे केले, नियम बनवले तरी महिलांसोबत घडणाऱ्या गुन्ह्यांची संख्या कमी झालेली नाही. उलट महिलांच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडण्याचा सिलसिला सुरुच आहे. आता अहिल्यानगर येथे एक अत्यंत किळसवाणा प्रकार समोर आला आहे. अहिल्यानगर येथे चालत्या बस मध्ये एका मद्यधुंद व्यक्तीने महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. परभणी जिल्ह्यातील कळमनुरी येथून पिंपरी चिंचवडकडे निघालेल्या बसमध्ये हा प्रकार घडला आहे. या बस मध्ये कळमनुरी येथून बसलेल्या महिलेच्या अंगावर बीड जिल्ह्यातील उमापूर येथून बसलेल्या एका व्यक्तीने लघुशंका केली ही घटना रविवारी पहाटे घडली आहे. उमापूर येथून मद्यधुंद अवस्थेत बसलेला व्यक्तीने पहाटेच्या वेळेस महिलेच्या अंगावर लघु शंका केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बसमध्ये लाईट लावण्यात आली आणि इतर प्रवाशांनी त्याला बस बाहेर काढले.
सोबतच पोलिसांना देखील घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लघुशंका करणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला ताब्यात घेतलं मात्र कोणाचीही तक्रार नसल्याने काही वेळानंतर समज देऊन सोडलं आहे. मात्र, चालत्या गाडीमध्ये महिलांच्या अंगावर लघुशंका केली जाते, ही घटना अत्यंत गंभीर असून मद्यधुंद अवस्थेतील प्रवाशांना बस गाडीत प्रवेश द्यायचा की नाही या प्रश्नासह महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. सरकारी बस असो वा खासगी बस महिलांना वेगवेगळ्या प्रकारे टार्गेट करुन त्रास दिला जातो.
जळगावमधली दुसरी घटना
जळगावच्या बसस्थानकात प्रवाशांचे दागिने चोरी करणाऱ्या दोन सराईत महिलाना जिल्हापेठ पोलिसांकडून अटक. उषा चंदन ससाने आणि अनिता विजय ससाने अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोन महिलांची नावं आहेत. दोघेही महिला नात्याने एकमेकांच्या देवरानी आणि जेठाणी असून दोघांकडून चोरीची कबुली. दोघा महिलांकडून एकूण १ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत. दोघां महिलांवर जळगाव शहर व अमळनेर पोलीस ठाण्यात देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर.
