maharashtra police bharti 2024: पावसाचा पोलीस भरतीला फटका, कुठे भरती पुढे ढकलली, कुठे उमेदवारांची चाचणी रद्दची मागणी
maharashtra police bharti 2024: राज्यात पोलीस भरतीची मैदानी चाचणी सुरु आहे. त्याचवेळी अनेक ठिकाणी पाऊस सुरु झाला आहे. काही ठिकाणी मैदानी चाचणी रद्द करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी मैदानी चाचणी पुढे ढकलण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे.

राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मैदानी चाचणी घेण्यात येत आहे. या चाचणीसाठी उमेदवार आले आहेत. परंतु अनेक ठिकाणी पावसामुळे मैदान ओले झाले आहे. त्याचा फटका उमेदवारांना बसत आहे. काही ठिकाणी मैदानी चाचणी रद्द करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी मैदानी चाचणी पुढे ढकलण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे. बीडमध्ये मैदानी चाचणी रद्द करुन ती एक जुलै रोजी घेण्यात येणार आहे. परंतु पावसाळ्यात मैदानी चाचणी घेण्याचा पोलीस प्रशासनाच्या निर्णयावर टीका होत आहे.
बीडमध्ये मैदानी चाचणी रद्द
बीडमध्ये दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. त्याचा फटका आता पोलीस भरतीला बसला आहे. मैदानावर चिखल झाल्याने आज होणारी पोलीस भरती रद्द करण्यात आली आहे. 1009 उमेदवारांची आज मैदानी चाचणी होती. मात्र पावसामुळे ही चाचणी आता एक जुलै रोजी होणार आहे. उमेदवाराने एक जुलै रोजी सकाळी साडेपाच वाजता मैदानावर हजर राहण्याचे पोलीस प्रशासनाने आवाहन केले आहे.
अमरावतीत चाचणी रद्द करण्याची मागणी
अमरावती ग्रामीण पोलीस भर्तीवर पावसाचे सावट आहे. पावसामुळे मैदान खराब झाले असल्याने मैदानी चाचणीसाठी पुढची तारीख द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. मैदानी चाचणीसाठी मैदान योग्य नसल्याचा उमेदवारांनी म्हटले आहे.
जळगावात मैदान झाकले
जळगावात पावसाच्या पार्श्वभूमीवर पोलीस भरती सुरू असलेला मैदान हे ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आले आहे. जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 137 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जळगावात पोलीस भरतीसाठी अकोला, लातूर, धाराशिव, यवतमाळ, धुळे या जिल्ह्यातून उमेदवार आले आहेत.
चंद्रपूरमध्ये १३७ पदांसाठी भरती सुरु
चंद्रपूर पोलीस दलातर्फे भरतीच्या ‘शर्यती’त डॉक्टर, इंजिनिअर, अन् शिक्षकही आहेत. या ठिकाणी १३७ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठी तब्बल १३ हजार ४४३ पुरुष, ६ हजार ३१५ महिला व २ तृतीयपंथी तर बॅण्ड्समनच्या नऊ पदाकरिता २ हजार १७६ पुरुष तर ६४६ महिला व १ तृतीयपंथी अशा एकूण २२ हजार ५८३ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
नवी मुंबईत भरतीला सुरुवात
नवी मुंबईत मैदानी चाचणी पोलीस भरतीला सुरवात झाली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये 185 पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया सुरु होती. परंतु पावसामुळे मैदानात चिखल साचला. यामुळे भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याने जाहीर करण्यात आले.
वाशिममध्ये मैदानी चाचणी
वाशिम जिल्हा पोलिस दलात ६८ जागांसाठी ४ हजार २७९ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यामध्ये पुरुष उमेदवार ३७६० आणि ५१९ महिला उमेदवार आहेत. यात पहिल्या दिवशी ६८६ उमेदवारांनी मैदानी चाचणी परीक्षा दिली. तर दुसऱ्या दिवशी ९४१ उमेदवारांनी मैदानी चाचणी परीक्षा दिली. तर काल तिसऱ्या दिवशी 732 उमेदवारांची मैदानी चाचणी परीक्षा दिली आहे.
रायगडमध्ये मैदानी चाचणीत अडचणी
रायगड जिल्ह्यात 422 रिक्त पदांसाठी पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार होती. मात्र पावसाचा जोर वाढल्याने अलिबाग येथील नेहुळी क्रीडा मैदानात शारीरिक आणि मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे. भरती प्रक्रियेत पावसाने हजेरी लावल्याने नेहुळी येथे होणाऱ्या या पोलिस भरती प्रसंगी मोठे संकट उभे राहिले आहे. काही भागांत शेड उभारण्यात आले आहे. त्याठिकाणी चाचणी घेऊन ही भरती सुरु ठेवण्यात येणार आहे.
भंडारा जिल्ह्यात भरती प्रक्रिया
भंडारा जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ६० पोलिस शिपायांच्या पदासाठी बुधवारपासून मैदानी चाचणी सुरू आहे. पुरुष मैदानी चाचणीच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारला ८०० उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी ५६२ उमेदवार हजर झाले. चाचणीत ५०४ उमेदवार पात्र ठरले तर ५६ उमेदवार अपात्र झाले. तीन दिवसांत २४०० उमेदवारांना बोलावण्यात आले. त्यापैकी १४८५ उमेदवार पात्र तर २१४ उमेदवार अपात्र घोषित करण्यात आले आहेत.
