मुंबईतील आंदोलनाला दोनदा परवानगी नाकारली, आता मनोज जरांगेंचा नवा डाव, सरकारचं टेन्शन वाढवणारी घोषणा
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांकडून दोनदा परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला असून, अंतरवाली सराटीमध्ये घडामोडींना वेग आला आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केली होती. 15 सप्टेंबर रोजी ते अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करण्याची परवानगी मिळावी यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने अर्ज करण्यात आला होता. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांकडून पुन्हा एकदा आंदोलनाला परवानगी मिळावी यासाठी दुसऱ्यांदा अर्ज केला मात्र दुसऱ्यावेळी देखील पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. हा मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दोनदा अर्ज करूनही परवानगी मिळत नसल्यानं आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे. अंतरवाली सराटीमध्ये घडामोडींना वेग आला आहे.
दरम्यान मुंबईमधील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील आझाद मैदानात एकाला उपोषण करण्याची परवानगी देण्यात यावी असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. एकट्याला उपोषणाला बसण्यासाठीची परवानगी मिळावी यासाठी अर्ज करा अशा सूचना मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती गंगाधर काळकुटे यांनी दिली आहे.
दरम्यान जरांगे पाटील दोन पाऊलं मागे आलेत, सरकारने त्यांच्या प्रकृतीचा विचार करून दोन पाऊल मागे यावं आणि परवानगी द्यावी. जो मार्ग त्यांनी सांगितलेला आहे, त्याच मार्गाने मुंबईला जाणार आहोत. मैदानावर उपोषणासाठी चार ते पाच जण जाणार आहेत. 17 दिवसांपासून उपोषण सुरू आहे, ज्या मार्गाने आम्ही जाणार आहोत त्या मार्गाने सगळ्या मागण्या मान्य करून पत्र द्या. दादा तिथेच माघार घेतील, असं या आंदोलनाबाबत बोलताना काळकुटे यांनी म्हटलं आहे.दरम्यान आता मनोज जरांगे यांना परवानगी मिळणार का? दोनदा परवानगी नाकारल्यानंतरही मनोज जरांगे पाटील हे मुंबईला जाणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
