450…350 अन् 45 मोफत बसेस, गणेशभक्तांच्या मतांसाठी चढाओढ; कोणत्या पक्षाच्या किती बसेस?
कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांचे दरवर्षी मात्र प्रचंड हाल होतात. हाच प्रकार यावेळीही घडू नये म्हणून अनेक राजकीय पक्षांनी मोफत बसेस, रेल्वेची सोय करून दिलेली आहे. गणेशभक्तांना कोकणात पाठवण्यासाठी राजकीय पक्षांची एका प्रकारे चढाओढच लागलेली पाहायला मिळत आहे. भाजपा आणि एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्षही यात मागे राहिलेला नाही.

Konkan Ganesh Festival : राज्यात सध्या गणेशोत्सवाची मोठ्या उत्साहात तयारी केली जात आहे. लवकरच घरोघरी बाप्पा विराजमान होणार आहे. कोकणात तर गणेशोत्सव हा अनेक महत्त्वाच्या सनांपैकीच एक मोठा सण आहे. या काळात मुंबई, पुण्यात आलेले कोकणातील चाकरमानी आपल्या गावी जात असतात. कोकणातील प्रत्येक घर पै-पाहुण्यांनी भरलेले असते. या काळात कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांचे मात्र प्रचंड हाल होतात. हाच प्रकार यावेळीही घडू नये म्हणून अनेक राजकीय पक्षांनी मोफत बसेस, रेल्वेची सोय करून दिलेली आहे. गणेशभक्तांना कोकणात पाठवण्यासाठी राजकीय पक्षांची एका प्रकारे चढाओढच लागलेली पाहायला मिळत आहे. भाजपा आणि एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्षही यात मागे राहिलेला नाही.
राजकीय पक्षांमध्ये बसेससाठी चढाओढ
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्त मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर बससेवा उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे ही बससेवा एकदम मोफत असून त्यासाठी या राजकीय पक्षांत एका प्रकारची शर्यतच लागली आहे. मुंबईच्या बांद्रा कलानगर परिसरातून शिंदेंच्या शिवसेनेकडून 364 बसेस कोकणात रवाना करण्यात येत आहेत. भाजपाच्या मोफत प्रवासाच्या बसेसची हीच संख्या 479 आहे. मनसे पक्षानेही या चढाओढीत उडी घेतली असून या पक्षातर्फे कोकणात जाण्यासाठी एकूण 53 बसेसची सोय करण्यात आली आहे. म्हणजेच मुंबई, उपनगरातून गणेशोत्सवासाठी कोणात जाण्याकरिता भाजपा, शिंदे गट आणि मनसे या तिन्ही पक्षांनी साधारण 900 बसेसची सोय करून दिली आहे.
कोणत्या नेत्याच्या किती बसेस?
वर उल्लेख केलेल्या तीन पक्षांच्या एकूण 900 बसेस कोकणात जाणार आहेत. या बेससमधून प्रवास करण्यासाठी पैसे घेण्यात येणार नाहीत. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार प्रकाश सुर्वे एकूण 100 बसेसची सोय केली आह. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्याकडून एकूण 45 बसेसची सोय करण्यात आलेली आहे. भाजपाचे संजय उपाध्याय यांनी 80 तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे मुलीन प्रभ यांनी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी 100 बसेस रेडी ठेवल्या आहेत. इतरही काही नेत्यांनी शेकडो बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत.
एसटी महामंडळानेही 1000 बसेस भाड्याने घेतल्या
यावेळी प्रवाशांना पिण्याचे पाणी, स्नॅक्स, लाडू, बिस्किटे तसेच इतर साहित्यही उपलब्ध करून देण्यात आले आहे. एसटी महामंडळाच्याही एकूण 433 बसेस कोकणात जाण्यासाठी तयार आहेत. एसटी महामंडळाने खासगी वाहतूकदारांकडून एकूण 1000 बसेस घेतल्या असून त्यादेखील कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सेवेत असतील. हा संपूर्ण प्रवास मोफत असेल.
