राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, प्रफुल्ल पटेलांनी थेट सांगून टाकलं; म्हणाले मी स्वत: …

अजित पवार यांच्या निधाननंतर आता राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाला मिळणार? असे विचारले जात आहे. यावरच खासदार प्रफुल्ल पटेल यांनी माहिती दिली आहे.

राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, प्रफुल्ल पटेलांनी थेट सांगून टाकलं; म्हणाले मी स्वत: ...
prafulla patil sunetra pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 03, 2026 | 2:42 PM

NCP National President : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्त्वाबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार यांच्यानंतर आता राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी सुनेत्रा पवार विराजमान झाल्या आहेत. परंतु राष्ट्रीय अध्यक्षपद अजूनही रिक्तच आहे. त्यामुळे या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची कमान नेमकं कोण सांभाळणार याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. मध्यंतरी खासदार प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय अध्यक्ष झालेले आहेत, असा दावा केला जात होता. परंतु नंतर त्यांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातू ही केवळ अफवा असल्याचे सांगितले. त्यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवाद पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत मोठे विधान केले आहे. त्यांनी स्वत:चीदेखील भूमिका स्पष्ट केली आहे.

मी सर्वात ज्येष्ठ सहकारी

आज मी आमच्या पक्षाबद्दल बोलणार आहे. कोणत्याही काल्पनिक गोष्टीवर मी बोलणार नाही. माझ्याकडून एवढंच सांगतो की, मी त्यांच्यासोबत पदाच्या हिशोबाने सर्वात ज्येष्ठ सहकारी होतो. माझी भूमिका अजितदादांच्या सुसंगत राहिली. तेव्हाच २०२३ रोजी आम्ही निर्णय केला. आम्ही त्यांच्यासोबत राहिलो. सर्व आमदार अजितदादांसोबत राहिले. त्यामुळे अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी चालली. आमच्याकडे निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनीसांगितले.

विलीनीकरणाच्या चर्चेवर नेमकं काय म्हणाले?

पुढे त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या दाव्यांवरही प्रतिक्रिया दिली. विलीनीकरणाबाबत अजितदादांची माझ्याशी काही चर्चा झाली की नाही. त्यांचीच चर्चा झाली असं लोक म्हणत आहेत. विलीनीकरणाबाबत आम्हाला माहीत नाही असं होऊ शकत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात प्रत्येक पक्षाने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवगेळी भूमिका घेतली. काही ठिकाणी आम्ही भाजपसोबत राहिलो. काही ठिकाणी शिंदेंसोबत राहिलो. स्थानिक स्वराज्यमध्ये दादांनी सांगितलं आपण सर्व वेगवेगळे लढत आहोत. आपली मते विभागली तर फरक पडू शकतो. त्यामुळे शरद पवार गटाशी बोलून समन्वय घडवू असं अजितदादा म्हणाले होते. तेवढीच चर्चा झाली, असे सांगत प्रफुल्ल पटेल यांन विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळून लावल्या. तसचे दादांचे मी दोन इंटरव्ह्यू बघितले. त्यात त्यांनी स्पष्ट केलं होतं की आमच्यासमोर विलीनीकरणाचा प्रस्ताव नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. तसेच फक्त स्थानिक स्वराज्यसाठी ती युती होती. शरद पवार यांना आम्ही भेटतो. सुप्रिया ताईंना भेटतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मी अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही

आमच्या पक्षा निर्णय घेण्याची एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया आम्ही करावी की इतरांनी करावी. मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष असल्याने माझ्यावर ही प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे मी समोर येतो. महाराष्ट्रात ही जबाबदारी खासदार सुनील तटकरेंवर आहे. त्यामुळे ते समोर येतात. त्यामुळे काम करताना आमची पदे भरण्याची जबाबदारी आमची आहे. पक्षाच्या अध्यक्ष निवडीसाठी पक्षाची बैठक बोलवावी लागेल. जनभावनेचा आदर करून आम्ही निर्णय घेणार आहोत, असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. तसेच मी स्वत: राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या स्पर्धेत नाही, असे सांगत आम्हाला आमच्या पद्धतीने निवड करू द्या, असे आवाहनही त्यांनी केले.