Winter session : एसटीच्या विलीनीकरणाबाबत बोलण्याऐवजी दडपशाही सुरू, सरकार पळ काढतंय-दरेकर
विलीनीकरणाबाबत बोलण्याऐवजी दडपशाही सुरू आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

मुंबई : यंदाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार घमासान होताना पहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अधिवेशनाआधीच अजय गुजर यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेत असल्याची घोषणा केली मात्र, काही ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांची हा निर्णय मान्य न करता आंदोलन सुरू ठेवले, तसेच विलीकरणावर ठाम असल्याचे सांगत, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली, एसटीच्या विलीनीकरणावरूनच आक्रमक होत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
विलीनीकरणाबाबत बोलण्याऐवजी दडपशाही
विलीनीकरणाबाबत बोलण्याऐवजी दडपशाही सुरू आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. तसेच हम करे सो कायदा… म्हणत एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सरकारने केल्याची टीकाही त्यांनी केली आहे. फक्त एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरूनच नाही, तर इतरही अनेक मुद्द्यांवरून त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
सरकार अधिवेशनापासून पळ काढतंय
सरकार अधिवेशनापासून पळ काढतंय, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या चर्चेला अर्थ काय, आमच्या प्रश्नांना ऊत्तरं नाहीत, सरकार बचावत्मक पवित्रा घेतंय असेही प्रवीण दरेकर म्हणाले आहेत. तसेच आत्ता कोरोनाची स्थिती समजून निर्णय घेणं योग्य राहील, निवडणुका पुढे ढकलणे राजकीय विषय असेल तर त्यानुसार निर्णय झाला पाहिजे असेही दरेकर म्हणाले आहेत.
सरकार चुकीचा पायंडा पाडतंय
विधानसभा अध्यक्ष निवडीवेळी होणाऱ्या मतदानावरूनही सरकारवर त्यांनी टीका केली आहे. नियम समितीत बदल करून सरकारने काम केलंय, गुप्त मतदान हा लोकशाहीचा गाभा आहे, चुकीचा पायंडा सरकार पाडतंय. मतदान आवाजी पद्धतीने कधीच होत नाही असेही ते म्हणाले आहेत. तसेच कोरोना आवाक्यात असेल तर फार निर्बंध घालू नये, सरकारने कोरोनाचा ऊपयोग आपल्या राजकीय कार्यासाठी करू नये, असा टोलाही दरेकरांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.
