मुख्यमंत्री, रिक्षावाला, शरद पवार, अरविंद सावंत, जोडे मारो आंदोलन पेटलं… काय आहे नेमकं कारण?
अरविंद सावंत यांनी तमाम रिक्षाचालकांची माफी मागावी अन्यथा आम्ही अधिक तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला. सावंत यांच्या प्रतिमेला यावेळी पायदळी तुडवण्यात आलं तसेच त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

मुंबई : ठाण्यात एकिकडे ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshani Shinde) यांना झालेल्या मारहाणीवरून ठाकरे विरुद्ध शिंदे-भाजप असं वातावरण तापलंय. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात राज्यभरातील रिक्षाचालकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. ठाणे आणि दहिसर येथील रिक्षा चालकांनी आज अरविंद सावंत यांच्याविरोधात जोरदार आंदोलन केलं. सावंत यांनी छत्रपती संभाजीनगर येथील वज्रमूठ सभेत केलेल्या वक्तव्याचा रिक्षा चलकांनी निषेध केलाय. यावरून अरविंद सावंत यांनी तमाम रिक्षाचालकांची माफी मागावी अन्यथा आम्ही अधिक तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला. सावंत यांच्या प्रतिमेला यावेळी पायदळी तुडवण्यात आलं तसेच त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.
काय आहे प्रकरण?
2 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची मोठी सभा पार पडली. या कार्यक्रमात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मोठं वक्तव्य केलं. महाविकास आघाडीचा प्रयोग झाला तेव्हा शरद पवार म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत मुख्यमंत्री पदासाठी दिग्गज नेते असताना या रिक्षावाल्याच्या अंडर काम करणार का? तरीही उद्धव ठाकरेंनी नाव दिलं होतं. पण शरद पवार यांनीच गळ घातली. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हा म्हटलं. तेव्हा उद्धव ठाकरेंनी ते चॅलेंज स्वीकारलं… असं वक्तव्य अरविंद सावंत यांनी केलं होतं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रिक्षावाला म्हणून अपमान करण्यात आला. मात्र राज्यभरातील रिक्षा चालकांच्या भावना दुखावण्यात आल्याचा आरोप झाला. यानंतर अरविंद सावंत यांनी या वक्तव्यातील रिक्षावाला हा शब्द शरद पवारांचा नव्हे तर माझाच भाषणाच्या ओघात आलेला शब्द आहे, असं स्पष्टीकरण दिलं.
रिक्षाचालक संघटना आक्रमक
दरम्यान, खासदार अरविंद सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी तमाम रिक्षा चालकांची माफी मागावी, अन्यथा आम्ही आक्रमक आंदोलन करू असा इशारा दिला आहे. आज दहिसर कांदरपाडा येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षावाल्यांनी दहिसर कांदरपाडा येथे आंदोलन केले. यावेळी खासदार अरविंद सावंत यांच्या प्रतिमेस आंदोलकांनी जोडे मारून जोरदार आंदोलन केले. यावेळी शेकडा रिक्षा चालक या आंदोलनात सहभागी झाले होते जोपर्यंत खासदार अरविंद सावंत रिक्षा चालकांची माफी मागणार नाहीत तोपर्यंत आंदोलन करण्यात येतील असा इशारा यावेळी आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिला. तसेच ठाणे येथेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी ठाणे महानगरपालिका ते ठाणे स्टेशन पर्यंत निषेध रॅली काढण्यात आली आहे.
