पुणे हादरलं, भर दिवसा थरकाप उडवणारा खून, दगडाने ठेचून…
पुण्यात भरदिवसा हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरात झडल्याचे बोलले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Pune Crime News : गेल्या काही दिवसांत पुणे शहरात अनेक हत्याकांड घडले आहेत. काही ठिकाणी तर भर दिवसा खून केल्याचे प्रकार समोर आले आहेत. या सर्व हत्यासत्रामुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला गेल्याचा आरोप केला जात आहे. तसेच पोलीस यंत्रणा नेमकं काय करत आहे? कायद्याचा धाक राहिलेला नाही, असाही दावा केला जातोय. असे असतानाच आता पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे भरदिवसा हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरात झडल्याचे बोलले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या हत्याकांडामुळे पुण्यात सध्या तणावाची स्थिती आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या ताज्या माहितीनुसार पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरात असलेल्या एका इमारतीजवळ तरुणाची हत्या झाली आहे. हत्या झालेल्या तरुणाचे वय 20 वर्षांपेक्षा कमी असल्याचे म्हटले जात आहे. हल्लेखोरांनी तरुणावर कोयत्याने हल्ला केला. तसेच नंतर दगडाने ठेचून त्याचा खून करण्यात आला आहे. ही घटना समोर आल्यानंतर या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सोबतच फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झाली असून सर्व पुरावे गोळ्या करण्यात आले आहेत. आता या प्रकरणातील आरोपींचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली?
पुण्यातील पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी या घटनेबाबत अधिक माहिती दिली आहे. या माहितीनुसार सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णकुंज सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. तौफीर शेख असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला अगोदर पाच व्यक्तींनी जबर मारहाण केली. त्यानंतर त्याला दगडाने ठेचून मारून टाकण्यात आले. यातले काही आरोपी हे अल्पवयीन आहेत. यापैकी दोन आरोपींनी याआधीही काही गुन्हे केल्याच्या तक्रारी आहेत. तर तौफीर शेख याच्याविरोधातही एकूण चार गुन्हे दाखल आहेत. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात मृत तरुणाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे या खुनाचा बदला म्हणून तर शेख याचा काटा काढण्यात आलेला नाही नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
