महायुतीत निवडणुकीचा पेच सुटेना; मंत्री सामंत घेणार शिंदेंची भेट; अंतिम निर्णय काय होणार?
महायुतीत पदवीधर निवडणुकीचा पेच सुटेना झाला आहे. मंत्री उदय सामंत आज उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार आहे..

राज्यात निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी, महायुतीने निवडणुकीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या निवडणुकीत महायुतीत समन्वयाचा अभाव असल्याचे समोर येत आहे. महायुतीत निवडणुकीचा पेच सुटेना झाला आहे. पुण्याच्या शिक्षक निवडणुकीत अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा देण्याबाबत शिंदेंच्या शिवसेनेत कुजबूज सुरू झाली आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेच्या भूमिकेकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
पुणे पदवीधर, शिक्षकची जागा भाजपला सोडण्यात आली आहे. यामुळे शिंदे गटात नाराजी असल्याचा दावा करण्यात येत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना युतीधर्म पाळण्याच्या सूचना दिल्या. शिंदे गटाचे पदाधिकारी हे अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा देण्याची मागणी करत आहेत. तर सचिन सानप देखील शिंदे गटाच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न करत आहेत.
शिवसेनेकडून पुण्याची जबाबदारी देण्यात आलेले मंत्री उदय सामंत हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ११.३० वाजता भेट घेणार असल्याची माहिती आहे. अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा देण्याबाबत शिवसेनेत कुजबूज सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून युतीधर्म पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षक, पदवीधर निवडणुकीत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षात समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा आहे.
सचिन सानप यांनी काय आवाहन केलं होतं?
सचिन सानप यांनी सर्व राजकीय पक्षांना पाठिंब्यासाठी आवाहन केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, ‘मी सगळ्याच राजकीय पक्षांनी पाठिंब्यासाठी विनंती केली आहे. एकनाथ शिंदे यांनाही पाठिंब्यासाठी विनंती केली आहे. मी अपक्ष म्हणून रिंगणात उतरलो आहे. खरंतर शिक्षकांचा आमदार हा शिक्षक असला पाहिजे. त्याला शिक्षकांचे प्रश्न कळले पाहिजे. या आमदाराला शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असली पाहिजे. ही भूमिका घेतली आहे. त्यामुळे मला शिंदेंनी पाठिंबा द्यावा. ते माझ्याबाबत सकारात्मक विचार करतील. मी त्यांच्या निर्णायाची वाट पाहतोय. मी अपक्ष निवडणूक लढत आहे. माझ्यासाठी सर्व शिक्षक प्राध्यापक संघटनांनी जोराने तयारी सुरू केली आहे’
