रेव्ह पार्टीबद्दल पुणे पोलिस आयुक्तांचा खुलासा, म्हणाले, खेवलकर हा खडसेंचा जावई असल्याचे आम्हाला…
Pune rave party : पुण्यातील खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू असताना पोलिसांनी धाड टाकली आणि एकनाथ खडसेंच्या जावयाला रंगेहात पकडले. यानंतर मोठी खळबळ उडाली. खडसेंनी यावर मोठा दावा केला.

एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टी करताना पुणे पोलिसांनी रंगेहात पकडले. मात्र, यावरून आता थेट पुणे पोलिसांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात आहेत. राज्यातील अनेक नेत्यांनी यावर शंका उपस्थित केलीये. माझ्या जावयाने त्याच्या पूर्ण आयुष्यात ड्रग्स बघितला नसल्याचा दावा खडसे यांनी केला. या रेव्ह पार्टीतून काही पुरूषांसह महिलांना देखील ताब्यात घेण्यात आलंय. जावई प्रांजलसाठी सासरे एकनाथ खडसे आणि पत्नी रोहिणी खडसे मैदानात उतरल्याचे बघायला मिळतंय.
आता या प्रकरणी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी खुलासा केलाय. अमितेशकुमार यांनी म्हटले की, खेवलकर हा खडसे यांचा जावई असल्याचे आम्हाला तपासात समजले. तोपर्यंत आम्हाला याबाबत कल्पना नव्हती. खराडी परिसरातील हॉटेलमध्ये गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत सिगारेटच्या पाकिटात कोकेनच्या तीन पुड्या लपवून ठेवल्याचे आढळून आले.
हे कोकेन नेमके कोणी आणले होते, याबाबत तपास सुरू आहे. दरम्यान, आरोपींच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ड्रगचे सेवन कोणी केले, हे स्पष्ट होईल. कारवाईच्या पहिल्या दिवशी या हॉटेलमध्ये पार्टी झाली होती. त्या पार्टीत आणखी कोण होते, याची चौकशी सुरू आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
ड्रग्स पार्टीमधील सात आरोपींच्या घराची झडती पूर्ण झाली आहे. झडतीदरम्यान घरातून अमंली पदार्थ मिळून आलेला नाही. पोलिसांनी मोबाईल, लॅपटॉप, मेमरी कार्ड जप्त केली आहेत. प्रांजल खेवलकर यांच्या घरासह इतर 6 जणांच्या घरी जाऊन पोलिसांनी ही झडती घेतली आहे. पार्टी पूर्वी आरोपींनी एकमेकांशी व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामवरून संपर्क केला होता.
शुक्रवारी झालेल्या पार्टीत या 6 जणांपैकी 2 जणांचा समावेश होता. खराडी येथील बर्ड स्टे सूट 25 ते 28 असे बुकिंग होते. हे बुकिंग एकनाथ खडसेंच्या जावयाच्या नावानेच करण्यात आले होते. शिवाय या हॉटेलच्या बुकिंगच्या काही पावत्या देखील पुढे आल्या. या प्रकरणी काही अजून मोठे खुलासे होण्याची दाट शक्यता आहे. मंत्री गिरीष महाजन या पार्टीचा आयोजक एकनाथ खडसेंच्या जावईच असल्याचे म्हटले होते.
