पैशाचा हव्यास, शॉर्टकर्ट निवडला… पुण्यात 13 जणांचा जीव घेणारी दारू विषारी कशी बनली? दारूमध्ये नेमकं… धक्कादायक माहिती समोर

Pune Toxic Liquor Case : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू झाला आहे. आता याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. झटपट पैसे कमावण्याच्या नादात या दारूमध्ये एक घातक पदार्थ मिसळला असल्याचे समोर आले आहे.

पैशाचा हव्यास, शॉर्टकर्ट निवडला... पुण्यात 13 जणांचा जीव घेणारी दारू विषारी कशी बनली? दारूमध्ये नेमकं... धक्कादायक माहिती समोर
Pune Toxic Liquor case
Image Credit source: Google
| Updated on: May 29, 2026 | 4:46 PM

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अशातच आता या विषारी दारूबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही दारू कशी तयार झाली? कुणी तयार केली? दारू गुत्त्यांपर्यंत कशी पोहोचली? यात कोणाचा सहभाग आहे? याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दारुकांडाची व्याप्ती सविस्तर

समोर आलेल्या माहितीनुसार उरळी कांचनमधील राधेशाम प्रजापती (वय 35) हा दारु तयार करण्याचे काम करतो. तर योगेश वानखेडे (वय 23) हा प्रजापतीकडून दारू खरेदी करुन पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वेगवेगळ्या दारू गुत्त्यांवर त्या दारुची विक्री करतो. योगेश वानखेडे हा दारू विक्री करणारा सराईत गुन्हेगार आहे. मात्र यावेळी योगेश‌ वानखेडेने प्रजापतीकडून दारू खरेदी केल्यानंतर अधिक नफा कमावण्याच्या उद्देशाने त्यामध्ये मिथेनॉल मिसळले. मिथेनॉलमुळे दारुचे प्रमाण दुप्पट झाले ज्यामुळे वानखेडेचा नफा वाढणार होता. मात्र यावेळी मिथेनॉल नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात मिसळले गेले आणि ती दारु विषारी बनली

विषारी दारू अनेकांना विकली

वानखेडेने ती दारु पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीत दारु गुत्ता चालणार्‍या कर्नेल सिंह विरका आणि गुरमित सिंह विरका या बापलेकांना विकली. अनेकांच्या मृत्युला हा गुत्ता कारणीभूत ठरला. तसेच योगेश‌ वानखेडेने त्याच्याकडील दारू पुण्याच्या खडकी भागातील कल्पेश अग्रवाल आणि पुण्यातील वडारवाडी भागातील अरिहंत धोत्रे यांना देखील विकली. त्याचबरोबर पुण्याच्या हडपसर आणि काळेपडळ भागात दारु गुत्ता चालणार्‍या आकाश जाधव आणि अशोक हांडे यांनाही विकली ज्यामुळे हडपसर भागात देखील मृत्यु झाले.

पुणे पोलिसांचे अपयश

ही विषारी दारू पिल्याने 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी सहा तर पुणे पोलिसांनी दोन अशा एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमधे 8 तर पुण्यात 5 अशा एकूण 13 मृत्यूंची नोंद झाली आहे. मात्र स्थानिकांच्या मते मृत्युचा आकडा कितीतरी जास्त आहे. दरम्यान, उरुळी कांचन हे पुणे ग्रामीण पोलीसांच्या हद्दीत येतं. त्यामुळे ही घटना पुणे ग्रामिण पोलीस, पुणे शहर पोलीस आणि पिंपरी चिंचवड शहर पोलीस या तिघांच अपयश मानलं जात आहे.

Follow Us