VIDEO: बापरे! दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सहा प्रवाशांची आरटीपीसीआर पॉझिटिव्ह; ओमिक्रॉनचा अहवाल सात दिवसात येणार

| Updated on: Dec 01, 2021 | 11:01 AM

राज्यातील जनतेच्या काळजात धस्स करणारी बातमी आहे. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सहा प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

VIDEO: बापरे! दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सहा प्रवाशांची आरटीपीसीआर पॉझिटिव्ह; ओमिक्रॉनचा अहवाल सात दिवसात येणार
dr pradip awate
Follow us on

पुणे: राज्यातील जनतेच्या काळजात धस्स करणारी बातमी आहे. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सहा प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या सहाही जणांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे की नाही याचा अहवाल येत्या सात दिवसात येणार आहे. त्यामुळे या सहाही जणांचे अहवाल काय येतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी याबाबतची माहिती दिली. ओमिक्रॉन हा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेत आढळल्यानंतर तातडीने पावले उचलली आहेत. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे दोन गटात वाटप केले आहे. जिल्हा निहाय त्याची वर्गवारी केली आहे. आतापर्यंत सहा प्रवासी दक्षिण आफ्रिका, नायजेरीया आणि झांबियातून आले आहेत. ते पॉझिटीव्ह आले आहेत, असं आवटे यांनी सांगितलं.

परदेशी प्रवाशांवर सर्वाधिक फोकस

25 नोव्हेंबरला केंद्र सरकारने नव्या विषाणूची दखल घेतली. आपण परदेशी प्रवाशांवर फोकस केला आहे. ज्या देशात ओमिक्रॉन आढळला आहे, त्या देशातून येणाऱ्या प्रत्येकाची आपण आरटीपीसीआर करत आहोत. त्याला लक्षणे असो किंवा नसो, त्याने लस घेतली असो किंवा नसो… प्रत्येकाची आपण आरटीपीसीआर चाचणी करत आहोत. पॉझिटिव्ह आली की आपण ती जेनेटिक्स सिक्वेन्सला पाठवत आहोत. निगेटिव्ह चाचणी आली तरी त्याला आपण सात दिवस क्वॉरंटाईन ठेवत आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.

सात दिवसात अहवाल

या प्रवाशांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना ओमिक्रॉनची लागण झाली की नाही हे शोधण्यासाठी त्याची जिनोमिक स्किवेन्सिंग करण्यात येणार आहे. ही किचकट प्रक्रिया आहे. त्याचा अहवाल येण्यासाठी सात दिवस लागणार आहे. सात दिवसानंतर नेमकं निदान होणार आहे, असं ते म्हणाले.

ओमिक्रॉनची लक्षणे सौम्य

महाराष्ट्रात येणाऱ्या परदेशी प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. शिवाय त्यांना सात दिवस क्वॉरंटाईनही करण्यात येत आहे. या आजाराची लक्षणे सौम्य असल्याचं दक्षिण आफ्रिकेत प्रिटोरीया राज्यातील डॉक्टर सांगत आहेत. या आजाराची लागण झालेल्यांना प्रचंड थकवा येत असल्याचं कळतं. अभ्यासाअंती या आजाराची रचना समजेल. तसेच मध्यरात्रीपासून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे, आपला आरोग्य विभाग अॅलर्टवर आहे, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

प्रस्थापितांच्या आघाडी सरकारकडून MPSC प्रश्नी फक्त तोंडाची वाफ, गोपीचंद पडळकरांचा आरोप

VIDEO : वॉशरुमला जाण्यासाठी महिलांकडून पत्र लिहून घ्यायचा, पुण्यात मॅनेजरला मनसे स्टाईलने दणका

मोक्कार पावसाची नाशिकमध्ये हजेरी, द्राक्ष बागायतदारांच्या काळजाचा ठोका चुकला, साहित्य संमेलनावरही सावट!