अजितदादांचा पुणे मेट्रोला हिरवा झेंडा, वनाज ते आयडियल कॉलनी मार्गावर पहिली ट्रायल रन

वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेच्या अंतर्गत वनाज ते आयडियल कॉलनी या टप्प्यात पुणे मेट्रोची ट्रायल रन घेण्यात आली. तीन डब्यांच्या दोन मेट्रो रेल्वेद्वारे साडेतीन किलोमीटर अंतरात ही चाचणी झाली.

अजितदादांचा पुणे मेट्रोला हिरवा झेंडा, वनाज ते आयडियल कॉलनी मार्गावर पहिली ट्रायल रन
अजित पवारांनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते पुणे मेट्रोला (Pune Metro) हिरवा झेंडा दाखवण्यात आला. वनाज ते आयडियल कॉलनी मार्गावर पुणे मेट्रोची पहिली ट्रायल रन झाली. अजित पवारांनी रिमोटने मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर सकाळी सात वाजताच्या सुमारास पुणे मेट्रो धावली. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश मिश्रा उपस्थित होते.

ऑक्टोबर अखेपर्यंत मेट्रोची प्रवासी सेवा

वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेच्या अंतर्गत वनाज ते आयडियल कॉलनी या टप्प्यात पुणे मेट्रोची ट्रायल रन घेण्यात आली. तीन डब्यांच्या दोन मेट्रो रेल्वेद्वारे साडेतीन किलोमीटर अंतरात ही चाचणी झाली. मेट्रोकडून याच मार्गावर काही दिवसांपूर्वी सरावपूर्व चाचणी घेण्यात आली होती. चाचणीनंतर ऑक्टोबर अखेपर्यंत मेट्रोची प्रवासी सेवा सुरु करण्याची महामेट्रोचा विचार आहे.

“म्हणून कार्यक्रम लवकर घेतला”

“सगळे म्हणतात सकाळी कार्यक्रम का घेतला? तर सकाळी सुरुवात चांगली होते. कोरोनाचं संकट आहे, आम्हीच नियम करायचे, अन् मोडायचे कसे? गर्दी नको म्हणून मी सकाळी 6 ला घ्या म्हटलं होतं, पण दीक्षित म्हणाले 7 ला घेऊ. इतर पुणेकरांना त्रास व्हायला नको, गर्दी व्हायला नको. म्हणून कार्यक्रम लवकर घेतला. आम्ही कार्यक्रम घेतो, लोक गर्दी करतात, मग आयोजकांवर गुन्हे दाखल होतात, इथं दीक्षितांवर गुन्हा दाखल व्हायला नको हा ही विचार होता” असं अजित पवार यांनी सांगितलं.

निवडणुका झाल्यावर राजकीय विचार बाजूला ठेवून विकास कामाला महत्त्व द्यायचं असतं, हे लक्षात घेऊन आम्ही काम करत आहोत. त्यातूनच पुणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. पुणेकरांचे आभार मानतो, ही काम सुरु असताना पुणेकरांनी संयम दाखवला, अशा शब्दात अजितदादांनी पुणेकरांचे आभार मानले. पीएमआरडीएच्या विकास आराखड्याला कालच मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. दोन रिंग रोड, 10 मेट्रो मार्गिका यांचा प्रामुख्याने समावेश आहे. पुण्याला सर्वोत्तम शहर बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे, या सगळ्या कामाला 75 कोटी रुपये लागतात, अशी माहितीही अजित पवारांनी दिली.

 

नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या

मेट्रोच्या प्रवासाचा अनुभव चांगला आहे. लवकरच पुणेकर मेट्रोमधून प्रवास करु शकणार आहेत. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हायला मदत होईल, असा विश्वास विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला. आयटी क्षेत्रातील नागरिकांसाठी मेट्रोचा वापर कसा करता येईल याचा विचार व्हावा. त्यामुळे वाहतुकीवरील मोठा ताण कमी होईल, अशी सूचनाही त्यांनी केली.

संबंधित बातम्या :

पुणे मेट्रोच्या कामाचा वेग, संत तुकारामनगर स्टेशन 96 टक्के पूर्ण, लवकरच…

Ajit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना

(Ajit Pawar gives Green Signal to Pune Metro First Trial run on Vanaj to Ideal Colony Route)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI