ज्यांच्या बुद्धीला जे वाटलं ते बोलले, अजित पवारांचा नारायण राणेंना टोला

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी राज्यातील आघाडी सरकार मार्चमध्ये कोसळणार असल्याचा दावा केला आहे. राणेंच्या या दाव्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हवाच काढून घेतली आहे.

ज्यांच्या बुद्धीला जे वाटलं ते बोलले, अजित पवारांचा नारायण राणेंना टोला
अजित पवार

पुणे: केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी राज्यातील आघाडी सरकार मार्चमध्ये कोसळणार असल्याचा दावा केला आहे. राणेंच्या या दाव्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हवाच काढून घेतली आहे. त्यांच्या बुद्धीला जे वाटलं ते ते बोलले. आमचं सरकार चालणार आहे हे आमच्या अनेक नेत्यांनी स्पष्ट केलंच आहे, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना नारायण राणे यांच्या दाव्याविषयी विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी हा दावा केला. ज्या दिवसापासून सरकार आलंय तेव्हापासून सरकार पडणार असल्याचं ऐकत आहे. पण सरकार चाललंय ना बाबा. कोण काय बोलतंय हे तुम्ही कोट करून सांगता. पण त्यांच्या सदसदविवेकबुद्धीला जे योग्य वाटतं ते ते बोलत आहेत. आमच्यातील अनेक मान्यवरांनी सरकार चाललं आहे. सरकारला काहीही धोका नाही हे आधीच स्पष्ट केलं आहे, असं पवार यांनी सांगितलं.

सरकारच दुधखूळं का?

यावेळी त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. दोन ठिकाणी निवडणुका होत आहेत. त्याला आम्हीच जबाबदार आहोत का? सरकारच दुधखुळं आणि विरोधक काहीच करत नाही असं काही आहे का? टाळी एका हाताने वाजते का महाराज? दोन हात लागतात ना? बिनविरोध निवडणूक लढवण्याबाबत पहिलं स्टेटमेंट कुणी काढलं? विरोधकांनी काढलं. काही केलं तरी मुंबईत दोनच उमेदवार निवडून येणार होते. तिसरा फॉर्म आला. त्या उमेदवाराला लढण्यात काही अर्थ नसल्याचं वाटलं. त्याने माघार घेतली. कोल्हापुरात कितीही गप्पा मारल्या, कितीही आवाज काढले तरी सतेज पाटीलच निवडून येणार होते. राष्ट्रवादीचे सर्वाधिक मते होती. काँग्रेसची त्याखालोखाल मते होती. तर धुळे-नंदूरबारमध्ये अमरीश पटेल कुठेही गेले तरी ते विजयी होतात. ते भाजपमध्ये गेले. त्यांच्याकडे संख्याबळ अधिक होते. त्यामुळे त्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली. अशा 6 पैकी 4 जागा बिनविरोध झाल्या. नागपूरमध्ये परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे तिथे निवडणूक होत आहे, असं त्यांनी सांगितलं.

ज्याच्या जागा त्याला द्यायचं ठरलं

वाशिममध्ये निवडणूक आहेत. शिवसेनेचे उमेदवार बजोरीया मागे निवडून आले आहेत. तिथेही निवडणूक होत आहे. सहा निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार कुठेही नव्हता. ज्याच्या जागा त्याला द्यायच्या हे ठरलं होतं. म्हणून एका ठिकाणी भाजप आणि एका ठिकाणी काँग्रेसने माघार घेतली. आता भाजप, शिवसेना, काँग्रेसचा उमेदवार होता. त्यांच्यात एकवाक्यता नसल्याने निवडणूक लागलेली दिसते, असं ते म्हणाले.

पटोलेंना शुभेच्छा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. 2024 ला काँग्रेस महाराष्ट्रात आणि देशात मोठा पक्ष होणार आहे असं पटोले म्हणाले होते. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पटोलेंना आमच्या शुभेच्छा आहेत, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

तावडेंचं प्रमोशन, बावनकुळेंना बळ, गडकरींचे हात मजबूत; फडणवीसांचं काय चुकलं?

नव्या कोरोना विषाणूनं जगाला पुन्हा धडकी, नेमका किती घातक आहे ओमीक्रॉन?

Omicron Variant: आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय भारत पुढे ढकलणार? पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक

Published On - 1:24 pm, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI