Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले का? अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं…
Ajit Pawar On Ladki Bahin Yojna : महायुतीला सत्तेत आणण्यात लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. मात्र या विजयानंतर लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्यात येणार असल्याची चर्चा सर्वत होती. याबाबत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. महायुतीचे 230 पेक्षा अधिक उमेदवारांचा विजय झाला. राज्यात महायुतीचं सरकार येण्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ गेमचेंजर ठरली. जुलै 2024 पासून सुरु करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गंत पात्र महिलांना दरमहा 1 हजार 500 रुपये देण्यात आले. लाडक्या बहिणींनी या योजनेची मतदानरुपी महायुतीला योग्य परतफेड करत पु्न्हा सत्तेत आणण्यात निर्णायक भूमिका बजावली. महायुतीने दिलेल्या आश्वासनानुसार, आता लाडक्या बहिणींना वाढीव 600 रुपये मिळणार आहेत. अर्थात आता दरमहा 2 हजार 100 रुपये मिळणार आहेत. मात्र निकालानंतर या योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. काळजीवाहू उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे संभ्रम दूर केलं आहे.
अजित पवार काय म्हणाले?
“अरे काळजीवाहू सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघाला बाळ”, असं उत्तर अजित पवार यांनी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर दिलं. दादा लाडकी बहीण योजनेचे निकष बदललेत का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला होता. अजित पवार यांनी पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधाला. यावेळेस ते बोलत होते. बाबा आढाव पुण्यात ईव्हीएमविरोधात आंदोलन करत आहेत. या निमित्ताने अजित पवारांनी बाबा आढाव यांची भेट घेतली.
कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपर्यंत असावं, ही अट या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रमुख अटींपैकी एक होती. मात्र त्यानंतरही अनेक जण या योजनेचा लाभ घेत आहेत. आता निकालानंतर सरकारकडून पात्र लाभार्थ्यांच्या अर्जाची फेरतपासणी करण्यात येणार असल्याची चर्चा होती. तसेच राज्यावरील कर्जाचा डोंगर पाहता निवडक महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये योजनेचे निकष बदलणार का? अशी भीती होती. मात्र अजित पवार यांनी उत्तर दिलंय. त्यामुळे लाडक्या बहिणींची काळजी मिटली आहे.
सहाव्या हप्त्याची प्रतिक्षा
दरम्यान या योजनेअंतर्गत आतापर्यंत 5 हप्ते देण्यात आले आहेत. जूलै ते नोव्हेंबर अशा 5 महिन्यांचे साडे सात हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळाले. मात्र आचार संहिता असल्याने डिसेंबर महिन्याचे पैसे आता निवडणुकीनंतर देण्यात येणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं होता. आता निकालानंतर आचार संहिता संपली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना दीड हजार मिळणार की 2 हजार 100 रुपये? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे.