मनुवादी व्यवस्था आणि संविधान एकाच वेळी वाटचाल करू शकणार नाही : डॉ. बाबा आढाव

मनुवादी व्यवस्था आणि संविधान एकाच वेळी वाटचाल करू शकणार नाही : डॉ. बाबा आढाव

मनुवादी व्यवस्था आणि संविधान हे एकाच वेळी एकत्र वाटचाल करू शकत नाहीत, असं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी व्यक्त केलंय.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Feb 20, 2021 | 11:12 PM

पुणे : भारतात विषमतेवर आधारीत मनुवादी व्यवस्था संपवण्यासाठी आपण भारतीय संविधानाचा स्वीकार केला आहे. त्यामुळे मनुवादी व्यवस्था आणि संविधान हे एकाच वेळी एकत्र वाटचाल करू शकत नाहीत, असं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी व्यक्त केलंय. ते पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित सर्वोच्च न्यायालयाचे दिवंगत न्यायमूर्ती पी. बी. सावंत (Justice P B Sawant) यांच्या आदरांजली सभेत बोलत होते. यावेळी बाबा आढाव यांनी संविधान केवळ पुस्तकातच रहात आहे. आपल्या रोजच्या जगण्यामध्ये संविधानाची मूल्य उतरली पाहिजेत, असंही नमूद केलं (Baba Adhav comment on caste system in India and Manu smriti in Pune) .

बाबा आढाव म्हणाले, “भारतीय समाज दुहेरी व्यवस्थेत जगतो. दैनंदिन व सामाजिक जीवनात तो चातुर्वर्ण्यावर आधारित मनूची व्यवस्था जगत असतो. तर प्रत्यक्षात त्याला कायदे, नियम यासाठी संविधानावर आधारलेली व्यवस्था लागू होते. मात्र मनुवादी व्यवस्था आणि संविधान हे एकाच वेळी एकत्र वाटचाल करू शकत नाहीत. मनुवादी व्यवस्था बदलण्यासाठी टीका केलीच पाहिजे, मात्र त्याचबरोबर आपणही आपल्या जगण्यात सत्यशोधनाचा विचार स्वीकारला पाहिजे.”

“संविधानाने स्विकारलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, विज्ञाननिष्ठा इ. मूल्यांचे चिंतन आणि प्रसार होणे आवश्यक आहे. मात्र इथली प्रस्थापित व्यवस्था ते होऊ देत नाही. आकाशवाणीवर पहाटे ऐकवलं जाणारं चिंतन हे त्याचं ठळक उदाहरण आहे. या चिंतनात सनातनी व्यवस्थेचा जाणिवपूर्वक प्रचार केला जातो. देवाची स्तुती, पौराणिक कथा, अवैज्ञानिक विचार आदी समाज मागे नेणारे विचार ऐकवले जातात. खरंतर आकाशवाणी हे शासकीय माध्यम आहे. या माध्यमातून भारतीय संविधानामध्ये सांगितलेल्या मूल्यांचा प्रसार-प्रचार झाला पाहिजे. अशा मूल्यांचा विचार पहाटे सांगितल्या जाणाऱ्या चिंतनामध्ये का होत नाही?” असा सवालही बाबा आढाव यांनी उपस्थित केला.

‘संविधानाची मूल्य रोजच्या जगण्याचा भाग बनली तरच भारतीय समाज सुखी होईल’

“संविधानाची मूल्य आपल्या रोजच्या जगण्याचा भाग बनविली तरच भारतीय समाज सुखी, समाधानी होईल. याबद्दल न्यायमूर्ती सावंत यांना खात्री होती आणि त्याविषयी ते आग्रही असत. चातुर्वर्ण्यावर आधारित ब्राह्मणी आणि मनुवादी व्यवस्था चुकीची असेल आणि त्यावर आपल्याला टीका करायची असेल तर आपणही आपल्या जगण्यात, विचारात कार्यक्रमात भूमिकेत सत्यशोधनाचा विचार स्वीकारला पाहिजे. केवळ एकतर्फी ब्राह्मणी व्यवस्थेला झोडपून चालणार नाही,” असंही मत त्यांनी व्यक्त केलं.

माहिती अधिकाराचा कायदा, अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा, मंडल आयोगाच्या विषयी पी. बी. सावंत यांनी घेतलेली आग्रही भूमिका, गुजरात दंगलीनंतरच्या सत्यशोधन समितीत त्यांनी केलेले काम याविषयी विविध वक्त्यांनी गौरवोद्गार काढले.

अभिव्यक्तीच्या अलका जोशी यांनी प्रस्तावना केली. मुकुंद काकडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉक्टर विमालकिर्ती, जमात-ए-इस्लामी चे सय्यद अश्रफी, राष्ट्र सेवा दलाचे विलास किरोते, सत्यशोधक कष्टकरी शेतकरी सभेचे किशोर ढमाले, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मिलिंद देशमुख ,राष्ट्र सेवा समूहाचे राहुल पोकळे, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेचे मधुकर कांबळे, बामसेफचे पी. डी. बोरकर, एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे सुभाष वारे, माजी सनदी अधिकारी अनुपम सराफ, निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरेश खोपडे व एस.एम.मुश्रीफ, इतिहासाचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे, पंजाबहून आलेले शेतकरी आंदोलनाचे नेते सज्जन कुमार, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या लता भिसे, लोकशासन संघटनेचे राजेंद्र गायकवाड, लोकायतचे नीरज जैन आदींनी यावेळी आदरांजली वाहिली.

हेही वाचा :

पी.बी. सावंतांनी महाराष्ट्राचं पुरोगामीपण जपलं, निर्भीड आणि परखड विचारधारा तेवत ठेवली: मुख्यमंत्री

व्हिडीओ पाहा :

Baba Adhav comment on caste system in India and Manu smriti in Pune

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें