साहेबांनी घर फोडलं का? अजितदादांच्या प्रश्नाला शरद पवाराचं सणसणीत उत्तर म्हणाले, गंमतीची गोष्ट…

Sharad Pawar on Vidhansabha Election 2024 : शरद पवार यांची बारामतीतील कव्हेरी गावात सभा होत आहे. या सभेत शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यांनी बारामतीतील निवडणुकीवर भाष्य केलं. शरद पवार यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे, वाचा सविस्तर...

साहेबांनी घर फोडलं का? अजितदादांच्या प्रश्नाला शरद पवाराचं सणसणीत उत्तर म्हणाले, गंमतीची गोष्ट...
शरद पवार
Image Credit source: Facebook
| Updated on: Oct 29, 2024 | 3:35 PM

बारामतीच्या कन्हेरीतून पवार कुटुंबीय प्रचाराचा शुभारंभ करत असतात. या परंपरेप्रमाणे युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी आज शरद पवार यांची पहिली सभा कन्हेरीत होत आहे. या सभेला बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार, इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. या भाषणात शरद पवार यांनी विविध मुद्दे मांडले. यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलं गेलं. यावर भाष्य केलं.

अजित पवारांचा सवाल

पहिला फॉर्म मी भरणार होतो. आम्ही सगळी तात्यासाहेबांची फॅमिली… आई सांगतेय की माझ्या दादाच्या विरोधात फॉर्म भरू नका. फॉर्म कुणी भरायला सांगितला. तर म्हणे साहेबांनी सांगितला. मग साहेबांनी आमचं घर फोडलं का?, असा सवाल अजित पवारांनी काल कन्हेरीच्या सभेत विचारला. त्याला आता शरद पवार यांनी उत्तर दिलंय.

शरद पवारांचं उत्तर

ज्यांच्या हातात सगळं काम दिलं त्यांनी पक्षच घेतला आणि दुसरीकडे जाऊन बसले. पद मिळालं. पण त्याच्या आधी चारवेळा ते पद मिळालं होतं ना… आता म्हणतात की घर मी फोडलं. म्हणजे गमतीची गोष्ट आहे. मला घर फोडण्याचं काही कारण नाही. पवार कुटुंबियांचा मी वडीलधारा आहे. मी कधी कुणाच्या मना विरोधात कोणत्या गोष्टी केल्या नाहीत. या पुढेही करणार नाही. इथून पुढे कुणी कुठलीही भूमिका घेतली. तरी मी चुकीच्या रस्त्यावर जाणार नाही, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले?

चार वेळा राज्याचं उपमुख्यमंत्रिपद बारामतीला आलं. तेही आपल्या पक्षाला मिळालं. मी अनेकवेळाला विरोधी पक्षाचा नेता होतो. अनेक वेळेला सत्ता माझ्या हातात नव्हती. जेव्हा सत्ता नव्हती तेव्हाही लोकांनी मला पाठबळ दिलं. त्यांनी माझी साथ कधी सोडली नाही. आज बारामतीच्या विकासाबद्दल बोललं जातं. त्यात माझा हातभार असेल, अजितदादांचा हातभार असेल. सगळ्यांच्या मदतीने हा विकास झालेला आहे. ज्याने चांगलं केलं त्याला चांगलं म्हणायचं हा माझा स्वभाव आहे, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवारांचा मोदींवर निशाणा

नवा उद्योग हा महाराष्ट्रात नव्हे तर गुजरातमध्ये सुरु करा, असं मोदींनी टाटांना सांगितलं. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प नरेंद्र मोदींनी गुजरातला नेला. त्यांना आतापर्यंत जसं यश मिळालं, तसं आता मिळणार नाही. यंदाची निवडणूक वेगळी आहे, असं शरद पवार म्हणाले.