पुण्याच्या तळेगाव एमआयडीसीत CO₂ गॅस गळती, दोन मजुरांचा मृत्यू तर तीन जखमी…
मावळच्या एमआयडीसीमधील एका कंपनीत co2 गॅसची गळती झाल्याने दोघा मजुरांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहेत.

पुण्याच्या मावळ येथील तळेगाव एमआयडीसीत एक मोठी दुर्घटना घडल्याची बातमी आली आहे. पुण्याच्या मावळ प्रांतातील एका कंपनीत कार्बनडायऑक्साईडची गळती झाल्याने दोन मजूराचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. तर तीन मजूर जखमी झाले आहेत. मजूरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि रेस्क्यु ऑपरेशन वेगाने सुरु आहे.
मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी परिसरातील नवलाख उंबरे येथील शॅफ्लर इंडिया कंपनीत कार्बन डायऑक्साइड (CO₂) गॅस गळतीची घटना घडली आहे. सुरुवातीला गॅस सिलेंडर स्फोटाची माहिती समोर आली होती. मात्र नंतर मिळालेल्या माहितीनुसार कंपनीत CO₂ गॅस गळती झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या दुर्दैवी दुर्घटनेत गणेश उंबरे आणि वैभव थोरात या दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून श्रीकृष्ण साहू, गौरीशंकर शर्मा आणि नरसिंह पाटील हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
एमआयडीसीत घडलेल्या या दुर्घटनेत जखमी झालेल्या मजूरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच कंपनी प्रशासन, एमआयडीसी सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ही कार्बन डायऑक्साईडची गॅस गळती नेमकी कशामुळे झाली याचा तपास सुरू असून परिसरात आवश्यक खबरदारीचे उपाय करण्यात आले आहेत. या घटनेमुळे तळेगाव एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली असून कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे असे आंबी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले आहे.
वार्षिक मेन्टेनन्सचे काम सुरु असताना अपघात
पुणे तळेगाव एमआयडीसीच्या नवलाख उंबरे येथील शॅफ्लर इंडिया कंपनीत दुपारी साडे बाराच्या सुमारास उषा फायर सेफ्टी इक्विपमेंट कंपनीचे कामगार वार्षिक मेन्टेनन्स आणि सर्व्हीसचे काम करत होते. त्यावेळी कंत्राटदार कामगार आणि शॅफ्लर इंडिया कंपनीचे कामगार हे काम करत होते. त्यावेळी कार्बनडायऑक्साईड सिलिंडरच्या सेफ्टी पिन लूझ बसल्याने हायप्रेशरने कार्बनडायऑक्साईडची गळती झाल्याने हा अपघात घडल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तात्काळ कार्बनडायऑक्साईड प्रचंड प्रेशरने लिक झाल्याने श्वास घेण्यास अडथळा आल्याने गुदमरुन कामगार जागीच बेशुद्ध पडल्याचे सूत्रांनी सांगितले. जखमी झालेल्या दोघा कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जणांवर उपचार सुरु आहेत.
.