Sunetra Pawar : त्यांनी अंधारात ठेवून संधी साधली… सुनेत्रा पवार यांचा बंडखोरांवर पलटवार, म्हणाल्या एकत्र येणार या सर्व अफवा
Sunetra Pawar on Purushottam Jagatap : बारामतीमधील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील बंडखोरीवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भाषणातून शाब्दिक फटकारे दिले. निवडणुकीत कोण बाजी मारतं याकडे सगळ्याचं लक्ष लागले आहे.

Sunetra Pawar on Purushottam Jagatap : बारामतीमधील सोमेश्वर सहकारी साखर काऱखान्याच्या निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरूषोत्तम जगताप यांनी वेगळी वाट चोखंदळली. अजितदादांचे विश्वासू सहकारी असलेल्या जगताप यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीला धक्का बसला. त्यावरून काल झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. दादांना जाऊन आठ महिने झाले, त्यांच्या नंतरची ही पहिली निवडणूक आहे. आपण सर्वजण पोरके झालो. आम्ही जास्त पोरके झालो, दादाची शिकवण होती. आपण रडायचं नाही, लढायचं असा ठाम निर्धार त्यांनी या सभेतून व्यक्त केला.
अंधारात ठेवून त्यांनी संधी साधली
त्यांनी जवळच्याच व्यक्तींच्या वर्तनावर टीका केली. या निवडणुकीत आपल्याला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. ज्यांच्यावर भरोसा, विश्वास ठेवला, त्यांनी आपल्याला बेसावध ठेवून अगोदरच सर्व तयारी केली होती. अंधारात ठेवून त्यांनी ऐनवेळी संधी साधली. त्या भस्मासुराच्या विरोधात आपला लढा आहे, असा इशारा त्यांनी नाव न घेता पुरूषोत्तम जगताप यांना दिला.
दादा गेल्याचं आपण अजिबात भांडवलं केलं नाही. जे आता बाजूला गेले, दादा हे त्यांची खरंच प्रेरणा होते का? की दादांची त्यांना अडचण होती? असा खणखणीत सवालही त्यांनी केला. मी भावनिक आहे, मी तर त्यांचं कुटुंब आहे. यांनी पहिल्या दिवसापासून दिशाभूल करण्याचा कार्यक्रम केला. दादांचे फोटो वापरले. दादांचा आवाज वापरला. शेवटी माझ्याही आवाजाचा वापर केला. सर्वांना कोण भुलवतं आहे? कुठलं मार्केटिंग सुरू आहे, अशी जोरदार टीका त्यांनी विरोधकांवर केली.
पुरूषोत्तम जगताप यांना टोला
जिल्हा परिषद निवडणूक झाली की कुटुंबाला वेळ देण्याचा शब्द दिला होता असे सांगत सुनेत्रा पवार यांना अश्रु अनावर झाले. तुमची ही वहिनी, शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहील असे त्या म्हणाल्या. पुढील पॅनलमध्ये उमेदवार पाहिले तर पाच नावं जुनी आहेत. बाकीचे उमेदवार नवीन आहेत. कारखान्याचा कारभार समजायला त्यांची टर्म संपेल. त्यांना ताटाखाली राहणारं मांजर हवंय असा टोला त्यांनी पुरूषोत्तम जगताप यांना लगावला.
