योग्यवेळी योग्य गोष्टी कळतील, फडणवीस यांचं सूचक विधान; भाजप मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत?

साधारणपणे जातीय तणाव आणि धर्मीक तणाव मोठे होत असताना अशावेळी तिथले गुन्हेगार एकटीव्ह होत असतात. ते वेळीच दाबले पाहिजे. धर्मांतराच्या घटना घडताना दिसत आहेत.

योग्यवेळी योग्य गोष्टी कळतील, फडणवीस यांचं सूचक विधान; भाजप मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत?
devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jan 14, 2023 | 1:14 PM

पुणे: नाशिक पदवीधर मतदारसंघात झालेल्या राजकीय नाट्यावरून जोरदार चर्चा रंगली आहे. ऐनवेळी काँग्रेस नेते डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. एबी फॉर्म असूनही त्यांनी अर्ज भरला नाही. मात्र, त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने खळबळ उडाली आहे. सुधीर तांबे यांनी मुलाचा विजय सोपा व्हावा म्हणून ही खेळी खेळल्याचं बोललं जात आहे. तसेच भाजपची या खेळीला फूस असल्याचीही चर्चा आहे. ही चर्चा सुरू असतानाच नाशिकची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं. तर, योग्यवेळी योग्य गोष्टी कळतील, असं सूचक विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध होणार नाही, असं खासदार संजय राऊत यांनी सांगितल्याचं देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं. त्यावर फडणवीस यांनी अत्यंत शांतपणे उत्तर दिलं.
बघत राहा. परिस्थितीवर नजर ठेवा. योग्यवेळी योग्य गोष्टी कळतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उमेदवार शुभांगी पाटील या मातोश्रीवर गेल्या आहेत. त्यांना ठाकरे गटाकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ठिक आहे. योग्यवेळी योग्य गोष्टींचा खुलासा करू, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

गुन्ह्यांचा आढावा

दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी 2022मधील गुन्ह्यांचा आढावा घेतला. या सोबत रेट ऑफ कन्व्हिक्शन वाढवण्यासाठी उपाययोजना करणार आहोत. ट्रान्सफर पोस्टिंगमध्ये भ्रष्टाचाराला सामोरे जावं लागणार नाही.

आता बदल्या केल्या त्यात भ्रष्टाचार झाला नाही. पोलिसांनी पारदर्शकता पाळावी. पोलिसांनी मुंबई पोलिसाचा नाव लौकीक मिळवावा. मधल्या काळात काही लोकांनी त्याला बट्टा लावला होता, असं फडणवीस म्हणाले.

कायद्यात बदल होणार

जातीय तणाव, धार्मिक तणाव दूर करण्यासाठी विशेष लक्ष द्यायला पोलिसांना सांगितलं आहे. सायबर क्राईम टाळण्यासाठी केवळ पोलीस स्टेशन वाढवणार नाही. त्यासाठी काही कन्व्हिक्शनची गरज आहे. या कायद्यात बदलाची गरज आहे. केंद्राला आम्ही काही सूचना केल्या होत्या. केंद्र सरकार या अधिवेशनात कायदा मांडणार असल्याचं सांगितलं जात आहे, असंही ते म्हणाले.

गोवंश हत्या रोखा

महसूल अधिकारी, पोलीस आणि लोकप्रतिनिधी यांचे अवैध युती आहे. सर्व प्रकारच्या पैशावर ही युती कब्जा करते. गोवंश हत्या पोलीस स्टेशनला माहिती असताना होते. कायदा करून काय उपयोग? हप्ता घेऊन गोवंश हत्या केली जाते. वरिष्ठ अधिकारी बाहेर पडत नाही. त्यांनी बाहेर पडले पाहिजेत अशा शब्दात फडणवीस यांनी पोलिसांची कान उघाडणी केल्याचं कळतं.

धर्मांतराच्या घटना रोखा

साधारणपणे जातीय तणाव आणि धर्मीक तणाव मोठे होत असताना अशावेळी तिथले गुन्हेगार एकटीव्ह होत असतात. ते वेळीच दाबले पाहिजे. धर्मांतराच्या घटना घडताना दिसत आहेत. त्याच्या जाहिराती येतात. त्याकडे लक्ष दिले जात नाही. याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, अशा सूचनाही पोलिसांना दिल्या असल्याचं सांगण्यात आलं.