
बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीकरांना व्यसनमुक्त होण्याचा कानमंत्र दिलं. व्यसनांपासून दूर राहा, गुटखा खाऊ नका, दारू पिऊ नका. नायतर रोज टाकणार आणि म्हणणार बघा, अशा शब्दात अजित पवार यांनी तळीरामांना फटकारले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वैद्यकीय महाविद्यालयाच्या सीटी स्कॅन विभागाचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी त्यांनी तळीरामांना फटकारलं. तसेच कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहण्याचं आवाहनही केलं. आजार टाळण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली अंगिकारा. सकाळी लवकर उठा. कोणतंही व्यसन करू नका. व्यसनं करशाल तर बरबाद व्हाल, असं अजित पवार म्हणाले.
कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळा. मास्क वापरा. मी फक्त जेवताना आणि पाणी पितानाच मास्क काढतो. काल सगळीकडे गेलो. पण मास्क काढला नाही, असं सांगतानाच तुम्हीही मास्क वापरा. हयगय करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं.
वैद्यकीय महाविद्यालयाला मदत करणारे अनेकजण उशीरा आलेत. आता माझं भाषण झाल्यावर तुम्ही लगेच उठू नका. नाहीतर म्हणाल झालं बाबाचं आणि निघताल. जरा थांबा. मी सगळ्यांचे सत्कार करणार आहे. जरा शिस्त पाळा माझ्यासारखी, असं अजित पवार यांनी म्हणताच एकच खसखस पिकली.
बारामती मेडिकल हब होऊ पाहतंय. बारामतीच्या आयुर्वेद महाविद्यालयासाठी 225 कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. सर्व सोयीसुविधायुक्त बारामती असावी हे पवारसाहेब आणि सुप्रियाचं स्वप्न आहे, असं सांगतानाच गेल्या काही वर्षात आपण बारामतीचा चेहरामोहरा बदलण्याचं काम केलं आहे, असंही ते म्हणाले.
बारामती वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत आयसीयू वॉर्ड लवकर सुरू करा. त्यामुळे रुग्णांची सोय होईल. सीटी स्कॅन युनिटही लवकर सुरू करा. गोरगरीबांचं जीवन सुखकर होण्यासाठी सुविधा लवकर द्या. सीएसआरमधून मिळणारी उपकरणंही वापरा. 500 बेडची क्षमता असतानाही वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय वापरता आले असते. त्यामुळे रुग्णालयाचे काम तातडीने मार्गी लावा, असं सांगतानाच मी वैद्यकीय महाविद्यालयाबद्दल सुचना केल्या आहेत. त्याची नोंद संबंधित विभागाने घेतली असेल. आता मी त्यावर लक्ष ठेवेल. नाहीतर एखाद्या दिवशी पहाटे पाचलाच येवून बघतो काम सुरुय की नाही, असंही त्यांनी सांगितलं.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 10 October 2021 https://t.co/wP02StmpDb #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 10, 2021
संबंधित बातम्या:
VIDEO | विवाहितेचे अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल, वसईत मनसे कार्यकर्त्यांचा तरुणाला बेदम चोप
राहुल गांधींनी मनातली सल सांगितली, म्हणाले, ‘संजयजी तृणमूल आणि आपच्या मत विभाजनाने भाजपला फायदा!’
(don’t drink alcohol and chewing gutkha, says ajit pawar)