Laxman Hake: मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारली तरी… लक्ष्मण हाके यांचा सरकारला मोठा इशारा, म्हणाले अफाट ओबीसी…
Laxman Hake on Mumbai OBC Agitation: मराठा आंदोलक मुंबईत धडकण्याचा इशारा कालच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तर आता प्राध्यापक लक्ष्मण हाके हे सुद्धा इरेला पेटले आहेत. ओबीसी बांधवांना मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कालपासून अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांसाठी उपोषणाला सुरुवात केली. त्यांनी मुंबईत वर्षा बंगल्यावर धडक देण्याचा इशारा दिला आहे. तर त्याचवेळी आता प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी सुद्धा सरकारची डोकेदुखी वाढवली आहे. ओबीसी बांधवांना मुंबईत आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यानंतर हाके यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे. त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावरही बोचरी टीका केली. येत्या दोन दिवसांत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
मुंबईत ओबीसी मोर्चा धडकणार?
1 सप्टेंबर रोजी पोलिसांनी मुंबईमधील आंदोलनाची परवानगी नाकारली असली तरी अफाट ओबीसी बांधव मुंबईच्या दिशेने मोर्चा घेऊन निघणार असा इशारा प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. ओबीसी बांधवांना मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारल्यानंतर हाके यांनी मोठा इशारा दिला आहे. त्याचवेळी मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी आम्ही मुंबईला मोर्चा घेऊन जाणार म्हणजे जाणारच असे त्यांनी ठणकावून सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांच्यावर बोचरी टीका
सरकारमधील सर्वच नेते मनोज जरांगे यांच्या जवळचे आहेत. मनोज जरांगे यांचे सरकारमधील नेते हे लाड पुरवत आहेत. 45 लाख गाड्या घेऊन मनोज जरांगे म्हणतात आम्ही मुंबईला जाणार आहोत मात्र मनोज यांना कुणीतरी सांगावं महाराष्ट्रात गाड्यांची संख्या किती आहे? मुंबईला जाण्यासाठी म्हणून जरांगे नेपाळ आणि इतर देशातील गाड्या मागवणार आहेत का? अशी बोचरी टीकाही हाके यांनी जरांगे पाटील यांच्यावर केली आहे.
जरांगे हे आता वर्चस्वाची भाषा बोलत आहेत. ते मुख्यमंत्र्यांचा अपमान करत आहेत. जरांगे यांना भाजपने रेड कार्पेट टाकले ,तर भाजप संपून जाईल अशी टीकाही त्यांनी काल केली. ओबीसी नेत्यांना लक्ष्य करणाऱ्या जरांगे यांचे इतके लाड का करण्यात येत आहेत? असा सवालही त्यांनी विचारला. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी पुण्यातून 1 सप्टेंबर रोजी आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये नवी मुंबईतील आगरी-कोळी समाजदेखील सहभागी होणार असल्याचे ते म्हणाले. कुणबी प्रमाणपत्र काढा आणि ओबीसींना गाडा असा प्रकार सुरू आहे. ओबीसीमधून मराठा समाजास आरक्षण देऊन ओबीसी आरक्षण उद्धवस्त होईल असा आरोप त्यांनी केला.