‘वखवखलेला आत्मा महाराष्ट्रात सगळीकडे फिरतोय’, उद्धव ठाकरे यांचा मोदींवर घणाघात

"अजित पवार आज म्हणाले की, मी पुढच्या सभेला मोदींना विचारेन की, ते भटकती आत्मा कुणाला म्हणाले? तुम्ही भटकती आत्मा कुणाला म्हणालात? शरद पवार यांना म्हणालात? भटकती आत्मा जशा असतात तसा वखवखलेला आत्माही असतो. हा वखवखलेला आत्मा सगळीकडे जातो", अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली.

वखवखलेला आत्मा महाराष्ट्रात सगळीकडे फिरतोय, उद्धव ठाकरे यांचा मोदींवर घणाघात
उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर निशाणा
| Updated on: Apr 30, 2024 | 9:10 PM

महाविकास आघाडीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि पुण्याचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मविआची आज पुण्यात जाहीर सभा पार पडली. या सभेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली. विशेष म्हणजे मोदींनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांना भटकती आत्मा म्हटलं होतं. त्यांच्या याच टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल पुण्यामध्ये सभा पार पडली. त्यांच्या सभेचं ठिकाण बरोबर होतं, रेसकोर्स. कारण त्यांना झोपेमध्ये सुद्धा घोडेबाजार दिसतो. पण त्यांना कोणीतरी सांगायला पाहिजे होतं की हे घोडे वेगळे होते आणि तुम्ही ज्यांना घोडे म्हणून घेतलं ते घोडे नाहीत खेचरं आहेत. खरे घोडे हे अश्वमेधाचे असतात, रथाचे असतात. टरबुजाला घोडा लागत नाही तर हातगाडी लागते”, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

“मला भाजप आणि मोदींची खरंच कीव येते. कारण मोदी यांच्याबरोबर माझ्याही सभा झाल्या आहेत. मला नाही आठवत की तेव्हा इतक्या वेळी महाराष्ट्रात सभा घेतल्या होत्या. त्यावेळी सभांमध्ये मोदींनी माझा उल्लेख माझे लहान भाऊ म्हणून केला होता. अरे मग लहान भाऊ होतो तर नातं का तोडलंत? तुम्ही 10 वर्ष काय केलं ते सांगा. अजूनही यांच्या मानगुटीवरती काँग्रेसचं भूत बसलं आहे तेच उतरत नाही”, अशी टीका ठाकरेंनी केली.

‘वखवखलेला आत्मा सगळीकडे जातो’

“यांची भाषा एवढी खाली आहे. अजित पवार आज म्हणाले की, मी पुढच्या सभेला मोदींना विचारेन की, ते भटकती आत्मा कुणाला म्हणाले? तुम्ही भटकती आत्मा कुणाला म्हणालात? शरद पवार यांना म्हणालात? भटकती आत्मा जशा असतात तसा वखवखलेला आत्माही असतो. हा वखवखलेला आत्मा सगळीकडे जातो”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली.

“शरद पवार त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायला लढत आहेत, मी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला लढत आहेत आणि हे स्वत:साठी लढत आहेत. मी माझं माझ्यासाठी आणि सगळी कामे मित्रांसाठी. आम्ही आमच्या मुलांसाठी लढतो आहोत, त्यांना मुख्यमंत्री करायचं की नाही हे जनता ठरवेल. पण मुख्यमंत्री बनायला लोकांची मते लागतात. एका फोनवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या मुलाला बीसीसीआयचं अध्यक्ष केलं तसं मुख्यमंत्रीपद नाहीय. पण हा वखवखलेला आत्मा महाराष्ट्रात सगळीकडे फिरतोय”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“या वखवखलेल्या आत्म्याला जरा जरी संवेदना असतील तर ते जिथे-जिथे फिरत आहेत तिथे तुमच्या नादानपणामुळे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांच्या आत्म्यांकडे बघा, त्यांच्या घराकडे बघा, त्यांच्या घरामध्ये तुटलेल्या मंगलसुत्रांकडे बघा. शेतकऱ्याचं उत्पन्न तुम्ही दुप्पट करणार होता. उत्पन्न दुप्पट झालंच नाही. पण उत्पादनाचा खर्च हा दुप्पट आणि तिप्पट झालाय”, असं ठाकरे म्हणाले.

‘एक वखवखलेला आत्मा 350 वर्षांपूर्वी गुजरातच्या दाओदमध्ये जन्मलेला’

“भाजपचं आज चाललंय ते चोरांनी वंदीले असं चाललं आहे. मोदींना कदाचित माहिती असेल किंवा नसेल, पण असाच एक वखवखलेला आत्मा 350 वर्षांपूर्वी गुजरातच्या दाओदमध्ये जन्मलेला. तो अग्र्यातून महाराष्ट्रावर चालून आलेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य चिरडून टाकण्यासाठी तो आला होता. तो महाराष्ट्र गिळायला आला होता. अहो 27 वर्षे औरंगजेब आग्रा सोडून महाराष्ट्रात आला. त्याने परत कधी आग्रा बघितलाच नाही. त्याचा आत्मा अजूनही इकडेच भटकत असेल कुठेतरी. अशी वखवख बरी नाही”, असा घणाघात मोदींनी केला.