पुणे शहरात मराठा आंदोलक आक्रमक, मुंबईकडे जाणारी वाहतूक रोखली
Pune News | मराठा समाजाने आरक्षणासाठी पुकारलेल्या आंदोलनाचे तीव्र पडसाद राज्यात सर्वत्र उमटत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी महामार्ग रोखण्यात आला आहे. पुणे येथे नवले पुलावर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी मुंबई आणि साताऱ्याकडे जाणारी वाहतूक रोखून धरली.

पुणे | 31 ऑक्टोंबर 2023 : राज्यात सर्वत्र मराठा आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटत आहे. राज्यातील विविध महामार्गांवर मंगळवारी आंदोलन करण्यात आले. अहमदनगर, सोलापूर महामार्ग आंदोलनकर्त्यांनी अडवला. पुणे येथे नवले पुलावर आंदोलन करण्यात आले. मुंबई आणि साताऱ्याकडे जाणारी वाहतूक रोखून धरण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी कार्यकर्ते आक्रमक झाले. या आंदोलनामुळे महामार्ग ठप्प झाला. मराठा समाजाला त्वरित आरक्षण मिळावे अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. राज्यात विविध पद्धतीने सर्वत्र आंदोलन करत मराठा आरक्षणाची मागणी लावून धरण्यात आली.
पुणे नवले पुलावर टायर जाळले, वाहतूक रोखली
पुण्यातील नवले पुलावर मराठा आंदोलक आक्रमक झाले. नवले ब्रिजवर टायरची जाळपोळ करण्यात आली. मुंबई आणि साताऱ्याकडे जाणारी वाहतूक आडवली. नवले पुलावरील वाहतूक आंदोलनकर्त्यांनी बंद केली. नगर जिल्ह्यातील मांदळी गावात रस्त्यावर टायर पेटवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे नगर सोलापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
सिन्नरला मुंडन करत आंदोलन, लातूरमध्ये पाण्याच्या टाकीवर चढले
मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी सिन्नर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने सात दिवसांपासून उपोषण सुरू आहे. सोमवारी मुंडन आंदोलन करत सरकारचा निषेध करण्यात आला. लातूर जिल्ह्यात नळेगाव येथे युवकांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. मराठा आरक्षणाची मागणी करीत आंदोलक पाण्याच्या टाकीवर चढून बसले आहेत. महिला आंदोलकांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले आहे.
बैलाच्या पाठीवर आरक्षणाची मागणी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहेत. तर या आंदोलनाचा भाग म्हणून सांगली जिल्ह्यातील वाटेगावच्या सोन्या बैलाच्या पाठीवर आरक्षणासंदर्भात मागणी करण्यात आली. मराठा आरक्षण मिळालाच पाहिजे, एक मराठा लाख मराठा, असे बैलाच्या पाठीवर लिहून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
नागपूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला
मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला. नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नांदुरा येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलनं करण्यात आले. यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
