मिशी नाही, तर काहीच नाही; मिशी असून मुलं नाही, पुण्यात आजी-माजी आमदारांची जुंपली

सध्या निवडणुका (Maharashtra Assembly Election) कोणत्या मुद्द्यावर लढल्या जातील याचा काही भरोसा नाही. विकासाचा मुद्दा केव्हाच मागे पडला आहे.

  • सचिन चपळगावकर, टीव्ही 9 मराठी, पुणे
  • Published On - 20:53 PM, 6 Oct 2019
मिशी नाही, तर काहीच नाही; मिशी असून मुलं नाही, पुण्यात आजी-माजी आमदारांची जुंपली

पुणे: सध्या निवडणुका (Maharashtra Assembly Election) कोणत्या मुद्द्यावर लढल्या जातील याचा काही भरोसा नाही. विकासाचा मुद्दा केव्हाच मागे पडला आहे. आता भावनिक मुद्द्यावर राजकारण करण्याचा काळ सुरू आहे. त्यातच काही नेत्यांची वैयक्तिक टीका (Personal Attack of Politicians in Pune) करताना पातळी घसरत असल्याचंही समोर येत आहे. पुण्यातील खेडमध्ये (राजगुरुनगर) आजी आणि माजी आमदारामध्ये असाच काहीसा कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं. खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते आणि विद्यमान आमदार सुरेश गोरे यांच्यात (Fighting between Dilip Mohite and Suresh Gore) सुरु असणाऱ्या या भांडणाने मतदारांची मात्र करमणूक होत आहे.

विकासाचा मुद्दा बाजूला सारत आमदार गोरे यांच्या कामाची चिकित्सा करण्याऐवजी माजी आमदार मोहिते यांनी गोरेंना उद्देशून मिशी नाही, तर काहीच नाही, असा टोला लगावला. याला उत्तर देताना विद्यमान आमदार सुरेश गोरेंची मात्र जीभ घसरली आणि त्यांनी मोहितेंवर वैयक्तिक टीका केली. गोरेंनी मोहितेंवर तुम्हाला मिशी आहे, पण पोरं नाही, अशी टीका केली.

विद्यमान आमदार सुरेश गोरे यांनी आपल्या मागील 5 वर्षांच्या कामावर निवडणूक लढवण्याऐवजी आक्षेपार्ह टीका केल्याने खेडमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला आहे. यामुळे गोरेंवर चौफेर टीकाही होत आहे. विशेष म्हणजे विकासाचा मुद्दा, आर्थिक मंदी आणि रोजगार हे मुद्दे अनेक राजकीय नेत्यांनी सोडून दिल्यात जमा आहे.

मतदारसंघाच्या विकासासाठी आपण काय करणार हे सांगण्याऐवजी माजी आमदार दिलीप मोहितेंनी विद्यमान आमदार सुरेश गोरेंना मिशी नाही, तर काहीच नाही असं म्हणत हिणवलं. त्यानंतर राजगुरुनगरमधील वातावरण चांगलेच तापले. त्यानंतर याला प्रत्युत्तर देताना आमदार सुरेश गोरेंनीही खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. सुरेश गोरे म्हणाले, “मला तर मिशी नाही. पण तुला मिशी असून काहीच (मुलं) नाही.” यावेळी गोरंनी कहर केला. विरोधक जितके खालच्या पातळीवर जातील त्याच्या खालच्या पातळीवर जाण्याची माझी तयारी आहे, असंही गोरे यावेळी म्हणाले.

अशाप्रकारे निवडणुकीत उमेदवारांचं काम आणि मतदारसंघासाठीच्या विकासाचं व्हिजन केंद्रस्थानी राहण्याऐवजी खालच्या स्तरावरील टीका-टीपण्णीलाच अधिक महत्त्व आलं आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न मार्गी लागण्याऐवजी केवळ मनोरंजनच होत असल्याचं एकूण वातावरण आहे.