यूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक

पिंपरी चिंचवडमधील भाजी मंडईमध्ये खोट्या नोटा खपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बहीण-भावाला बेड्या ठोकण्यात आल्या.

यूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक

पिंपरी चिंचवड : यूट्यूबवर व्हिडीओ पाहून घरच्या घरी खोट्या नोटा छापणाऱ्या बहीण-भावाला अटक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमधील भाजी मंडईमध्ये खोट्या नोटा खपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जोडगोळीला बेड्या ठोकण्यात आल्या. (Pimpri Chinchwad brother sister arrested for printing fake currency at home)

सुनीता रॉय आणि दत्ता प्रदीप रॉय या भावंडांना अटक झाली आहे. छापलेल्या खोट्या नोटा खपवण्यासाठी ते स्थानिक मार्केटमध्ये प्रयत्न करत होते. भोसरी येथील भाजी मंडईमध्ये या नोटा खपवण्याचा प्रयत्न करताना हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक करुन त्यांच्याकडून शंभर रुपयाच्या 34 नोटा जप्त केल्या आहेत.

आरोपी सुनीता आणि दत्ता हे दोघेजण यूट्युबवर व्हिडीओ पाहून घरातच खोट्या नोटा तयार करत होते. त्यासाठी त्यांनी प्रिंटर आणि कागद जमा केले होते. शंभर रुपये दराच्या बनावट नोटा छापण्याचा सपाटाच या दोघा भावा बहिणीने लावला होता.

भोसरी चौकीसमोर असलेल्या भाजी मंडईमध्ये सुनीता आणि दत्ता नकली नोटा भाजी खरेदी करण्यासाठी वापरत होते. दोघांनी भाजी खरेदी करुन त्या नकली नोटा भाजी विक्रेत्याला दिल्या. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी सुनीता आणि दत्ता यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करत पोलिसांनी शंभर रुपये दराच्या 34 नोटा, दोन एचपी कंपनीचे प्रिंटर, कागदी रिम आणि सुट्टे कागद असा एकूण 34 हजार 210 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हेही वाचा –

माहेरुन सासरी जाताना कालव्यात घसरुन पडली, कोल्हापुरात नवविवाहितेचा मृत्यू

बेपत्ता झाल्याचा बनाव, नवी मुंबईचा विवाहित तरुण गर्लफ्रेंडसोबत इंदूरला सापडला

(Pimpri Chinchwad brother sister arrested for printing fake currency at home)

Published On - 4:12 pm, Thu, 17 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI