दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या समितीचा अहवाल समोर, चार महत्वाच्या गोष्टीनंतर…
Pune Deenanath Mangeshkar Hospital: दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलसमोर 'पैसा झाला मोठा, जीव झाला छोटा' अशा घोषणा देत काँग्रेसने आंदोलन केले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दीनानाथ मंगेशकरच्या हॉस्पिटलसमोर बोर्डावर शाही फेकली. शिवसेना उबाठाकडूनही आंदोलन करण्यात आले.

Tanisha Bhise death case: पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप झाले आहे. भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे पीए असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा गुरुवारी मृत्यू झाला. या प्रकरणास रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप होऊ लागल्यानंतर रुग्णालयाने चौकशी समिती नेमली. या समितीचा अहवाल समोर आला आहे. त्यात चार महत्वाच्या गोष्टी नमूद केल्या आहे. अहवालानुसार रुग्णास दहा ते वीस लाख खर्च येईल, त्याची कल्पना रुग्णाच्या नातेवाईकांना दिली होती. तसेच परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितल्याचे म्हटले होते.
काय आहे चौकशी अहवालात
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने नेमलेल्या चौकशी समितीने चार मुद्यांवर भर दिला आहे. समितीने म्हटले की, महिला रुग्णासाठी सात महिन्यांच्या जुळ्या मुलांची प्रसृती धोकादायक होती. त्याची कल्पना देण्यात आली होती. जुळी मुले असूनही महिला सहा महिने तपासणीसाठी आली नव्हती. अगावू रक्कम मागितल्याच्या रागातून रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार केली. रुग्णास दहा ते वीस लाख खर्च येईल, बाळांना दोन-अडीच महिने रुग्णालयात ठेवावे लागेल, तुम्हाला जमेल तेवढे पैसे भरुन दाखल व्हा, असे सांगितल्याचे समितीने म्हटले आहे.
विविध संघटना, पक्ष आक्रमक
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाविरोधात काँग्रेस, शिवसेना उबाठा आक्रमक झाली. त्यांनी शुक्रवारी रुग्णालयात आंदोलन केले. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलसमोर ‘पैसा झाला मोठा, जीव झाला छोटा’ अशा घोषणा देत काँग्रेसने आंदोलन केले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दीनानाथ मंगेशकरच्या हॉस्पिटलसमोर बोर्डावर शाही फेकली. युवक काँग्रेसकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या समोरील गेटच्या चौकशी कक्षाच्या काचा फोडण्याचा प्रयत्न झाला. तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून रुग्णालयात मोठा राडा करण्यात आला. चिल्लर फेकून शिवसेना उबाठाने घटनेचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई करा, गुन्हा दाखल करा अन्यथा आंदोलन करणार असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अलंकार पोलीस ठाण्यात निवेदन दिले.
आरोग्य दूत नेमणार- मिसाळ
दरम्यान, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात शुक्रवारी होत असलेल्या विविध आंदोलनामुळे पोलिसांची तारांबळ उडाली आहे. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहे. विविध संघटनांकडून आंदोलने सुरू आहे. रुग्णालयातील प्रकाराबाबत मंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, रुग्णालयातील प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. बरेच धर्मादाय रुग्णालय सेवा देत नाही हे खरे आहे. आता धर्मादाय आयुक्त रुग्णलायांमध्ये एक आरोग्य दूत नेमणार असल्याचे माधुरी मिसाळ यांनी सांगितले.
