Pune Land Scam : एक छद्दामही घेतला नाही तरी 300 कोटींचा व्यवहार; पुणे जमीन घोटाळ्यात अजून एक धक्कादायक प्रकार, यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी चाल?

Sheetal Tejwani Pune Land Scam : मुंढवा जमीन खरेदीप्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. खरेदी खतावरून ही बाब समोर आली आहे. व्यवहाराचा हा अजब नमुना यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी तर केला नाही ना? असा सवाल करण्यात येत आहे.

Pune Land Scam : एक छद्दामही घेतला नाही तरी 300 कोटींचा व्यवहार; पुणे जमीन घोटाळ्यात अजून एक धक्कादायक प्रकार, यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी चाल?
शीतल तेजवाणी, पार्थ पवार,
| Updated on: Nov 09, 2025 | 9:41 AM

Sheetal Tejwani-Amedia Company : मुंढवा जमीन खरेदीप्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. खरेदी खतावरून ही बाब समोर आली आहे. कुलमुखत्याधारक शीतल तेजवानी यांनी 300 कोटींच्या जमिनींच्या व्यवहारापोटी पार्थ पवार यांच्या मालकीच्या अमेडिया कंपनीकडून एक छद्दामही न घेता थेट खरेदीखत केल्याचे समोर आले आहे. एक रुपयांही न घेता हा 300 कोटींचा व्यवहार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या खरेदीखतावरून ही भलीमोठी रक्कम कशी आणि केव्हा देण्यात येणार याचा कुठलाही उल्लेख केलेला नाही. व्यवहार केवळ शब्दावर झाला का? असा सवाल करण्यात येत आहे. तर पुढे हे प्रकरण समोर आले तर यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी ही अगोदरच चाल खेळली नाही ना? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

खरेदीखतावर काय असते नमूद?

खरेदीखतावर दोन्ही पक्षांची नावं, स्वाक्षऱ्या, कागदपत्राआधारील पुरावे यांची माहिती असते. तर खरेदीखतावेळी किती पैसे दिले, ते कोणत्या पद्धतीने, ऑनलाईन, धनादेश, रोखीत दिले याचा उल्लेख असतो. जमीन विक्रेता आणि खरेदीदार यांच्यात याविषयीची सविस्तर माहिती देण्यात येते. पण पुणे जमीन गैरव्यवहारात अशी कोणतीही माहिती या खरेदीखतावर नाही. 300 कोटींच्या व्यवहाराचे कोणतेही विवरण खरेदीखतावर देण्यात आले नाही. विशेष म्हणजे एक रुपयांचाही व्यवहार झालेला नाही. त्यामुळे केवळ विश्वासावर हा व्यवहार झाला का? असा सवाल करण्यात येत आहे. तर दुय्यम निबंधकांनी हे खरेदीखत डोळ्याखालून घातले नाही का? असा सवाल करण्यात येत आहे.

शीतल परदेशात पळाली?

शीतल तेजवाणीचा फोन गेल्या दोन दिवसांपासून लागत नसल्याचे पोलिसांच्या उशीरा का असेना लक्षात आले. त्यानंतर आता शीतल परदेशात तर पळून गेली नाही ना? अशी शंका पोलिसांना आली आहे. शीतलच्या डोक्यावर कोट्यवधींचे कर्ज असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे. शीतलने अमेडियाकडून एक रुपयाही न घेता खरेदीखत का करून दिले असा मोठा प्रश्नही पोलिसांना पडला आहे. शीतल तेजवाणीची माहिती इमिग्रेशन विभागाकडून घेण्यात येत आहे.

पार्थवर गुन्हा का नाही हे मुख्यमंत्रीच सांगू शकतात

दरम्यान याप्रकरणी पार्थ पवार यांच्यावर अद्यापही गुन्हा का दाखल झाला नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. तर सरकारने याविषयी कानावर हात ठेवले आहे. जे दस्त नोंदणीसाठी आले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. तर याप्रकरणी अकोल्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांना विचारणा करण्यात आली. पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल का करण्यात आला नाही असा सवाल करण्यात आला असता, पार्थवर गुन्हा का दाखल झाला नाही हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच सांगू शकतील असे वक्तव्य त्यांनी केले.