खाली तुफान वाहणारी इंद्रायणी, अन् अचानक कोसळला पूल, वाहून गेलेल्या 25 जणांसोबत नेमकं काय घडलं?
पुण्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत एकूण 25 पेक्षा जास्त पर्यटक वाहून गेले आहेत, असे सांगितले जात आहे.

Pune Indrayani River Bridge Collapsed : पुण्यातील मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत 20 ते 25 पर्यटक वाहून गेले आहेत. दुर्दैवाने या दुर्घटनेत एकूण 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आमदार सुनिल शेळके यांनी दिली आहे. या घटनेचे काही व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. त्यामुळेच ही दुर्घटना नेमकी का झाली? असे विचारले जात आहे.
नेमकं काय घडलं?
आज रविवार असल्यामुळे शाळा, खासगी आणि शासकीय कार्यालये यांना सुट्टी असते त्यामुळे कुंडमाळा या पर्यटणस्थळाला भेट देण्यासाठी बरेच पर्यटक जात होते. या ठिकाणाला भेट देण्याआधी इंद्रायणी नदीवरील पूल ओलांडावा लागतो. या पुलावर मोठा पूल बसवण्यात आलेला होता. मात्र अचानकपणे हा पूल कोसळला आणि पुलावरून जाणारे 20 ते 25 पर्यटक थेट धो-धो वाहणाऱ्या नदीत वाहून गेले.
पूल झाला होता ओव्हरवेट
हा पूल बराच जुना आहे. असे असताना पुलावरून जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली होती. मिळालेल्या माहितीनुसार हा पूल कोसळला तेव्हा त्यावरून एकूण 50 पर्यटक जात होते. त्यामुळे ओव्हरवेट झाल्याने हा पूल क्षणात तुटला आणि त्यावरून जाणारे पर्यटक थेट नदीत कोसळले.
पुलावरून नेल्या दुचाकी, हवेत हालात होता पूल
मिळालेल्या माहितीनुसार हा पूल अगोदरच जीर्णावस्थेत होता. असे असताना त्यावरून जाणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त होती. त्यात भर म्हणून या पुलावरून जड असणाऱ्या दुचाकी नेल्या जात होत्या. हा पूल हवेतही हालत होता, असे सांगितले जात आहे. या सर्व गोष्टींमुळे हा पूल अचानकपणे कोसळला आणि ही दुर्दैवी घटना घडली आहे. वाहून गेलेले सर्व प्रवासी सुखरुप असावेत, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
युद्धपातळीवर केलं जातंय बचावकार्य
दरम्यान, सध्या बचावकार्य करण्यासाठी एनडीआरएफची टीम पोहोचली आहे. तसेच या ठिकाणी एकूण 18 रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. स्थानिक लोकही जमेल त्या मार्गाने बचावकार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्थानिक पोलीसही घटनास्थळी जाऊन पोहोचले आहेत. नदीत वाहून गेलेल्यांचा शोध घेणे चालू आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
