पुणे : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या वक्तव्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. पक्षाच्या वतीने शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदावर्ते यांनी मराठा (Maratha) समाजाच्या भावना दुखावल्या असून या पती पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख आणि कार्यकर्त्यांनी हा तक्रार अर्ज शिवाजीनगर पोलिसांना दिला आहे. मराठा समजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी न्यायालयाने काल गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे (Kolhapur Police) दिला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान आक्षेपार्ह विधानामुळे सदावर्ते यांच्याविरोधात सातारा आणि त्यानंतर कोल्हापूरमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच सदावर्ते यांच्यावर मुंबई, पुणे, बीड, सोलापूर अशा अनेक ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.