Pune Teachers Constituency Election Results : खेळच संपला… माजी आमदाराचा दारूण पराभव, पुणे शिक्षक मतदारसंघाचा धक्कादायक निकाल
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागला असून पुणे शिक्षक मतदारसंघात माजी आमदार जयंत आजगावकर यांचा दारूण पराभव झाला. ही महाविकास आघाडीसाठी मोठी धक्कादायक बाब आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातही तीव्र चुरस दिसून आली. एकूणच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काट्याची टक्कर दिसतेय. निवडणुकीत पैशाचा वापर झाल्याचे गंभीर आरोपही करण्यात आले आहेत.

राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतमोजणी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत सरळ लढत असल्याने या निवडणुकीची चुरस वाढली आहे. काही ठिकाणी महायुतीचे तर काही ठिकाणी महाविकास आघाडीचे मित्र पक्ष मैत्रीपूर्ण लढत देत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कुणाचा वरचष्मा राहतो याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. मात्र, सध्या तरी या निवडणुकीत महायुतीला 3 आणि महाविकास आघाडीला 2 जागा मिळताना दिसत आहे. या निवडणुकीत एका माजी आमदाराचाही पराभव झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत जयंत आजगावकर आणि दत्ता सामंत हे दोघे माजी शिक्षक आमदार उभे होते. त्यामुळे या निवडणुकीत काय निकाल लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण या निवडणुकीत जयंत आजगावकर यांचा पराभव झाला आहे. आजगावकर हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांना 8620 मते मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार 17948 मतांनी आघाडीवर आहेत. आजगावकर यांच्यासाठी हा पराभव अत्यंत धक्कादायक असल्याचं म्हटलं जात आहे.
रासपच्या उमेदवाराचा आरोप
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पार्टीचे उमेदवार दत्तात्रय सावंत उभे आहेत. सावंत यांनी या निवडणुकीवर प्रतिक्रिया देताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. या निवडणुकीत पैशाचा वरेमाप वापर करण्यात आला. शिक्षकांच्या घरी जबरदस्तीने पैसे टाकण्यात आले. सेटिंग करण्यासाठी जिल्ह्यात मंत्री ठाण मांडून बसले होते. केवळ आणि केवळ पैशाचा खेळ सुरू होता. अशी निवडणूक मी यापूर्वी कधीच पाहिली नाही. मात्र, तरीही शिक्षक माझ्यासोबत राहिले याचं समाधान आहे, असं दत्तात्रय सावंत म्हणाले.
पदवीधर मतदारसंघाचं चित्र पालटणार?
पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपला जड जाताना दिसत आहे. या निवडणुकीत मोठी चुरस रंगली आहे. भाजपच्या स्मिता जाधव यांना 1 लाख 2 हजार 427 मते मिळाली आहेत. तर शरद पवार गटाच्या हर्षदा देशमुख जाधव यांना 1 लाख 11 हजार 279 मते मिळाली आहेत. ठाकरे गटाचे उमेदवार सुनील मोदी यांना 3 हजार 66 मते मिळाली आहेत. या निवडणुकीत शरद पवार गटाच्या हर्षदा देशमुख जाधव यांनी आघाडी घेतल्याने भाजपमध्ये सन्नाटा पसरला आहे.