मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर व्यापाऱ्यांची सबुरीची भूमिका; पुण्यातील आंदोलन मागे

पुणे महानगरपालिकेकडून शहरातील अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. | Pune traders shops

  • योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे
  • Published On - 10:01 AM, 9 Apr 2021
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर व्यापाऱ्यांची सबुरीची भूमिका; पुण्यातील आंदोलन मागे
पुण्यात 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध

पुणे: राज्य सरकारने लादलेल्या कोरोना निर्बंधामुळे आक्रमक झालेल्या पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्तास सबुरीचे धोरण अवलंबायचे ठरवले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आता व्यापारी महासंघाने (Pune traders Shops) पुण्यातील नियोजित आंदोलन स्थगित केले आहे. आम्ही आता सोमवारपासून दुकाने उघडू, अशी माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली. (Pune Traders will not open shops today)

तत्पूर्वी आज पुण्यातील व्यापाऱ्यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात बंड करत दुकाने उघडण्याचा इशारा दिला होता. पुणे महानगरपालिकेकडून शहरातील अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाविरोधात शहरातील व्यापारी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती. आज आपली दुकाने सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत उघडण्याचे त्यांनी जाहीर केले होते.
या पार्श्वभूमीवर पुण्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी शहरातील दुकाने उघडल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला होता.

व्यापाऱ्यांनी दुकाने उघडल्यास राज्य शासनाच्या नियमांची अंमलबजावणी केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला. तसेच शहरात घातलेल्या निर्बंधांची अधिक कडक अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेकडून पोलिसांना आणखी काही अधिकार दिले जाणार असल्याचेही आयुक्‍तांनी स्पष्ट केले होते. मात्र, आता व्यापाऱ्यांनी तुर्तास आंदोलन मागे घेतल्याने हा संघर्ष टळला आहे.

पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटर ‘हाऊसफुल्ल’

एकीकडे पुण्यातील व्यापारी कोरोनाचे निर्बंध पाळणार नाही या भूमिकेवर ठाम असताना पुण्यातील कोरोना रुग्णांचा आकडा हा धडकी भरवणारा आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे पुण्यातील आरोग्य यंत्रणा अपुऱ्या पडू लागल्या आहेत.

पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरही पूर्णपणे भरले आहे. अवघ्या 12 दिवसांमध्ये हे सेंटर भरले आहे. सध्याच्या घडीला या कोव्हिड सेंटरमध्ये 600 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गेल्यावर्षी कोरोनाची साथ शिगेला असतानाही या कोव्हिड सेंटरमध्ये 300 ते 400 रुग्ण होते. मात्र, आता हे कोव्हिड सेंटरही पूर्णपणे भरले आहे.

संबंधित बातम्या:

पुण्यात कोरोनाचा कहर, रुग्णांसाठी बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि लसीची आकडेवारी काय? वाचा आयुक्तांची माहिती

कोरोना झालाय, पण घरीच राहून उपचार घ्यायचेत , मग 25 हजाराच्या बाँडवर सही करा

पुणेकरांनो सावध राहा; एकही व्हेंटिलेटर बेड उरला नाही, फक्त 376 ऑक्सिजन बेड शिल्लक

(Pune Traders will not open shops today)