पक्ष म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी; ‘या’ पक्षाच्या नेत्याकडून निखिल वागळेंना समर्थन

Vishwajeet Kadam on Nikhil Wagle attack : वरिष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर काल हल्ला झाला. हे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. वकील असीम सरोदे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. तर एका राजकीय नेत्याने वागळेंना पाठिंबा दिला आहे. वाचा...

पक्ष म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी; या पक्षाच्या नेत्याकडून निखिल वागळेंना समर्थन
| Updated on: Feb 10, 2024 | 3:40 PM

प्रदिप कापसे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, पुणे | 10 फेब्रुवारी 2024 : काल पुण्यात वरिष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला झाला. त्यानंतर सर्वच स्तरातून या घटनेवर प्रतिक्रिया येत आहेत. निखिल वागळे यांच्यावरच्या हल्ल्याचा विरोधी पक्षांकडून निषेध करण्यात येत आहे. अशातच आता एका राजकीय पक्षाच्या नेत्याने निखिल वागळे यांच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. तसंच आपण वागळेच्या पाठीशी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर निखिल वागळे यांच्यावरील हल्ला प्रकरण आता न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाण्याची शक्यता आहे.

कुणी दिलं समर्थन?

काल हल्ला झाल्यानंतर अनेकांना निखिल वागळे यांना समर्थन दिलं आहे. काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी अॅड असीम सरोदे यांची भेट घेतली. यावेळी आपण सोबत असल्याचं विश्वजीत कदम म्हणाले. या प्रकरणी विधिमंडळात आम्ही आवाज उठवणार आहोत. काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही पाठीशी आहोत. अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विश्वजीत कदम यांनी केली आहे.

हल्ला प्रकरण कोर्टात जाणार?

निखिल वागळे यांच्यावरील हल्ला प्रकरण आता न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. वकील असीम सरोदे या प्रकरणी याचिका दाखल करणार आहेत. पुण्याच्या नवीन पोलीस आयुक्तांनी करारवाई करावी. अन्यथा थेट पोलीस आयुक्तांना दोषी करणार, अशी प्रतिक्रिया असीम सरोदे यांनी दिली आहे.

अखेर गुन्हा दाखल

निखिल वागळे यांची गाडी तोडफोड प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. राष्ट्र सेवा दलाच्या बाहेर आंदोलन करणाऱ्या 43 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर पण गुन्हा दाखल झाला आहे. पर्वती पोलीस ठाण्यात आंदोलन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांचं स्पष्टीकरण काय?

निखिल वागळे यांच्यावर काल हल्ला झाल्यानंतर पुणे पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. निखिल वागळे यांनी वादग्रस्त पोस्ट शेअर केल्यामुळे पुण्यातील वातावरण तापले होतं. घटनेत सहभागी असलेल्या आरोपींविरुद्ध दंगल, मालमत्तेचे नुकसान या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींच्या अटकेची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुणे शहर पोलिसांकडून आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.