Ravindra Dhangekar : ते तर दरोडेखोर, रवींद्र धंगेकर मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात मैदानात, भाजपविरुद्ध शिंदे सेना वाद पेटणार
Ravindra Dhangekar over Murlidhar Mohol : पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीची बैकायदेशीरपणे विक्री केल्याच्या मुद्यावरून पुण्यातील राजकारणं तापलं आहे. मोहोळ यांच्या पत्रकार परिषदेनंतर रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीची बेकायदेशीरपणे विक्री केल्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. याप्रकरणात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे थेट कनेक्शन असल्याचा आरोप शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. तर शिंदे सेनेचे रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्याविरोधात शड्डू ठोकले आहेत. अगदी थोड्यावेळापूर्वी मंत्री मोहोळ यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. तर रवींद्र धंगेकर यांनी मात्र मोहोळ हतबल दिसले आणि ते दरोडेखोर असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीची बेकायदेशीरपणे विक्री केल्याप्रकरणात आपला कुठलाही संबंध नसल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केले. गोखले यांच्यासोबत दोन एलएलपी केल्या होत्या. पण त्यांच्यात कुठलाही व्यवहार झालेला नाही. तर जैन बोर्डिंग व्यवहारापूर्वीच मी 25 नोव्हेंबर 2024 मध्ये या दोन्ही एलएलपीमधून बाहेर पडलो, असा खुलासामंत्री मुरलीधर मोहोळ यांनी असा खुलासा केला. तर राजू शेट्टी यांच्या टीकेनंतर पुण्यातील काही उंदीर लागलीच बिळाबाहेर आल्याचा टोला त्यांनी रवींद्र धंगेकर यांचे नाव न घेता लगावला.
धंगेंकरांच्या निशाण्यावर मोहोळ
रवींद्र धंगेकरांनी मंत्री मुरलीधर मोहोळ यांची पत्रकार परिषद ऐकल्याची माहिती दिली. त्यांनी मोहोळ हे दरोडेखोर असल्याचा आरोप केला आहे. रवींद्र धंगेकर यांनी आपल्याकडे याविषयीचे पुरावे असल्याचा दावा केला आहे. मुरलीधर मोहोळ हे या पत्रकार परिषदेत हतबल दिसल्याचे ते म्हणाले. त्यांना राज्यातील जमिनीचे भाव माहिती नसल्याचा टोला त्यांनी लगावला. मुरलीधर मोहोळ यांची हतबलता बघून मला या सर्व जमिनीच्या विक्री प्रकरणात संशय आहे. 1958 मध्ये जैन समाजाच्या गरिब मुलांना शिकता यावे यासाठी ही जमिनी खरेदी केल्या गेली. पण काही संचालकांना हाताशी धरून ही जमीन आता खरेदी केल्या गेली, असे ते म्हणाले.
गांधी, विशाल गोखले आणि मुरलीधर मोहोळ हे एकत्रित आले. त्यांनी ही जागा पाहिली. ही जागा त्यांनी कशी हडपली याची मी तारखेप्रमाणे माहिती देईल. 21 नोव्हेंबर 2023 रोजी ही जागा 230 कोटी रुपयांना जाणार हे अगोदरच एका मुलाखतीत सांगण्यात आले होते. यामध्ये टप्प्याटप्प्याने या गोष्टी झाल्याचा आरोप धंगेकरांनी केला.
मुरलीधर मोहोळ यांनी राजीनामा द्यावा
काय म्हणता धंगेकर, जमीन चोर निघाला मुरलीधर अशी चर्चा कालपासून धंगेकरांकडून करण्यात येत आहे. त्यांनी काल याविषयीचे ट्वीट केले. त्यावरून वातावरण तापले आहे. तर आज धंगेकर यांनी मोहोळ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. या सर्व प्रकरणात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचे त्यांना सांगितले. धंगेकर यांनी एकीकडे निलेश घायवळ प्रकरणात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात टीका केली तर आता ते मोहोळ यांच्याविरोधात आक्रमक दिसत आहेत.
