हाताला प्लास्टर… अभाविपच्या राड्यात जखमी झालेला रिहान बाबुडे थेट राहुल गांधींच्या भेटीला

पुण्यात अभाविप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमधील संघर्षात जखमी झालेले काँग्रेस कार्यकर्ते रिहान बाबुडे राहुल गांधींच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यांच्या हाताला प्लास्टर असून, राड्यात झालेला मार आणि एकूण घटनाक्रम राहुल गांधींना सांगण्यासाठी ते आले आहेत. 'छात्रो की गुंज' कार्यक्रमापूर्वी झालेल्या या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

हाताला प्लास्टर... अभाविपच्या राड्यात जखमी झालेला रिहान बाबुडे थेट राहुल गांधींच्या भेटीला
Rehan Babude
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 22, 2026 | 6:06 PM

राहुल गांधी यांच्या छात्रो की गुंज या कार्यक्रमाच्या आधीच काल अभाविपच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात राडा केला. अभाविपचे कार्यकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर पोलिसांनी जमावावर लाठीमार केला. या हल्ल्यात काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. त्यापैकी एक रिहान बाबुडे हा सुद्धा एक आहे. रिहानच्या हाताला जबर मार लागला आहे. रिहान आज राहुल गांधी यांच्या भेटीसाठी कार्यक्रमस्थळी आला आहे. राहुल गांधी यांना भेटून तो सर्व प्रकार सांगणार आहे.

रिहान बाबुडे हा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. कालच्या राड्यात त्याला जबर मार लागला. त्याच्या हाताला मार जबर मार लागल्याने प्लास्टर करण्यात आलं आहे. त्याला मुक्का मारही लागला आहे. आज राहुल गांधी छात्रो की गुंज कार्यक्रमासाठी पुण्यात आले आहेत. येथील हॉटेल शेरेटनमध्ये राहुल गांधी थांबले आहेत. या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. रिहान सुद्धा याच हॉटेलात आला आहे. त्याच्या हाताला प्लास्टर आहे. राहुल गांधींना भेटण्याची त्याची तीव्र इच्छा आहे. काल झालेला सर्व प्रकार राहुल गांधींना सांगायचं असल्याचं तो म्हणाला. यावेळी त्याने टीव्ही9 मराठीशी संवाद साधला.

याला जबाबदार कोण?

काल आम्ही घटनास्थळी होतो. तिथे अभाविपचे लोक आले. त्यांनी आल्याबरोबर वाद घालून मारामारी सुरू केली. मुलींनाही मारहाण केली. आम्हालाही मारलं. माझ्या हातावर काठी मारण्यात आली. पोलिसांनीही आमच्यावर लाठीमार केला. त्यात आमचे अनेक सहकारी जखमी झाले. आमचा काही दोष नव्हता. या सर्वांना जबाबदार कोण आहे? हेच सांगण्यासाठी मी राहुल गांधी यांना भेटायला आलो आहे. त्यांना हा सर्व प्रकार सांगणार आहे, असं रिहान म्हणाला. राहुल गांधींना भेटून मी कालची सर्व माहिती देणार आहे. तसेच पुढे काय करायचं याचं मार्गदर्शनही घेणार असल्याचं त्याने सांगितलं.

आमचे तीन कार्यकर्ते जखमी

दरम्यान, कालच्या राड्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही संताप व्यक्त केला आहे. पुण्यातील COEP मध्ये विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा प्रश्न मांडला म्हणून त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला. ही अत्यंत गंभीर आणि संतापजनक बाब आहे. या घटनेत पुणे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आनंद दुबे आणि रिहान बाबुडे यांना मारहाण झाली. मी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आमचा एक कार्यकर्ता जखमी असून त्याला संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

निष्पक्षपणे चौकशी करा

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी हिंसेचा मार्ग स्वीकारला जात असेल तर ही केवळ गुंडगिरी नाही, हा विद्यार्थ्यांच्या निर्भयपणे आवाज उठवण्याच्या अधिकारावरच हल्ला आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. राहुल गांधी पुण्यात हजारो विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या आवाजाला दडपण्याऐवजी त्यांचे प्रश्न ऐकले गेले पाहिजेत. विद्यार्थ्यांचा आवाज दाबता येणार नाही. न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा संघर्ष थांबणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us