
सुनील थिगळे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 21 फेब्रुवारी 2024 : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी थेट सहकार मंत्री आणि अजितदादा गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना पाडण्याचं आवाहन केलं. तुमच्या तालुक्यातील अनेकांनी माझ्यासोबत काम केलं. अनेकांनी प्रामाणिकपणे काम केलं, ते हयात नाहीत. निष्ठा हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. पण आज काय पाहतोय आपण? त्यांना आम्ही सगळं दिलं, विधानसभा, मंत्री, विधानसभा अध्यक्षपद, साखर कारखान्याचे राष्ट्रीय अध्यक्ष पद दिलं. मात्र त्यांनी पाच टक्केही निष्ठा पाळली नाही. ते निघून गेले. असे लोक नागरिकांशीही निष्ठा पाळणार नाहीत. त्यांना धडा शिकवण्याची आता वेळ आली आहे, असं आवाहनच शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांचं नाव न घेता केलं.
राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव हा मतदारसंघ आहे. दिलीप वळसे हे शरद पवार यांचे मानसपुत्र मानले जातात. वळसे पाटील यांच्या मतदारसंघातच आज शरद पवार यांची तोफ धडाडली. यावेळी पवार यांनी दिलीप वळसेंवर जोरदार हल्ला चढवला. वळसेंकडे निष्ठाच नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना काय द्यायचं राहिलं होतं? काय कमी पडू दिलं? आमदार केलं, अनेक मंत्रीपदे दिली, विधानसभेचं अध्यक्षपद दिलं, देशाच्या साखर उद्योगाचं अध्यक्षपद दिलं, अनेक संस्थांवर काम करण्याची संधी दिली एवढं सर्व देऊनही त्यांच्यात पाच टक्केही निष्ठा राहिली नाही. ते निघून गेले. असे लोक नागरिकांशीही निष्ठा पाळणार नाहीत. त्यांना धडा शिकवण्याची आता वेळ आली आहे, असं शरद पवार म्हणाले.
मागच्या निवडणुका आठवा. मागच्या निवडणुकीत आपल्या जिल्ह्यातील उमेदवार कुणाच्या नावावर निवडणूक लढवत होते? निवडणुकीत त्यांनी कुणाचा फोटो वापरला? हे सर्व माहीत असताना कुठून तरी तुरुंगात टाकण्याची धमकी आली, भीतीचं संकट आलं म्हणून हे लोक दुसऱ्या बाजूला गेले. त्यामुळे आपल्याला जागं व्हावं लागेल. अनेक ठिकाणी तुमच्या जिल्ह्यातील लोकांनी माझ्यासोबत काम केलं. अनेक लोक होते त्यांनी माझ्यासोबत काम केलं. आज हे लोक नाहीत. या लोकांचं वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्याकडे निष्ठा होती. त्यांनी निष्ठेशी तडजोड केली नाही. राज्यात आम्ही पक्षाची स्थापना केली. तो पक्ष फोडला. पक्षातील अनेक लोक आहेत. त्यांना निवडून कुणी दिलं?, असा सवाल शरद पवार यांनी केला.
आज पंतप्रधान कुठे कुठे काय काय बोलतात. अशोक चव्हाण यांच्याबद्दल मोदींनी कुठे तरी जाहीर भाष्य केलं. परिणाम काय झाला? दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चव्हाम भाजपात गेले. काँग्रेसने मुख्यमंत्रीपद दिल्याचंही ते विसरले. पक्ष फोडणं, माणसं फोडणं, नेते फोडणं सुरू आहे. जायचं तर तुरुंगात जा नाही तर आमच्या पक्षात या, अशी धमकी दिली जात आहे. आज काय चित्रं आहे? भ्रष्टाचाराचा नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा, अशी स्थिती आज देशात आहे. त्यामुळेच तुरुंगात जाण्याऐवजी भाजपमध्ये जाण्याची ही भूमिका अनेक राज्यातील नेते स्वीकारत आहेत. अशी स्थिती राज्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात आपल्याला संघर्ष करावा लागेल, असंही ते म्हणाले.