‘इकडची बॅग भरली गल्ली टू दिल्ली, आता कमळाकडे…’ सुनील तटकरे भाजपच्या वाटेवर? शिंदे सेना आमदाराच्या दाव्याने खळबळ

Mahendra Dalvi on Sunil Tatkare: सत्तेसाठी एकत्र आले असले तरी महायुतीतील घटक पक्षात मात्र दिलजमाई झाल्याचे दिसत नाही. कोकणात तर शिंदे सेना आणि अजितदादांच्या गटात विस्तवही जात नसल्याचे समोर येत आहे.

इकडची बॅग भरली गल्ली टू दिल्ली, आता कमळाकडे... सुनील तटकरे भाजपच्या वाटेवर? शिंदे सेना आमदाराच्या दाव्याने खळबळ
अजित पवार, सुनील तटकरे
Updated on: Nov 21, 2025 | 1:22 PM

Sunil Tatkare-BJP: स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वीच महायुतीत ठिणगी पडली आहे. सत्तेसाठी एकत्र आलेल्या तीनही घटक पक्षात दिलजमाई झाले नसल्याचे दिसून येत आहे. कोकणात तर शिंदे सेना आणि अजितदादा गटात शिमगोत्सव सुरू आहे. भरतशेठ गोगावले यांच्या आरोपाची राळ कमी होते ना होते, तोच आता आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहा येथे झालेल्या सभेत दळवी यांनी राष्ट्रवादी आणि तटकरेंवर चांगलेच तोंडसूख घेतले. पालकमंत्री पदापासून दोन्ही पक्षात वाद धुमसत आहे.

तटकरेंवरील आरोप त्रिवार सत्य

ऱाष्ट्रवादीच खाली होत चालली आहे. लोक कंटाळले आहेत. सिंचन घोटाळ्यापासून आतापर्यंत घोटाळेच घोटाळे लाजही वाटत नाही अशी परिस्थिती आहे.आम्ही मनाचे शेठ आहोत.परवा तुमच्या सभेत मी केलेले आरोप हे खरे आहेत, ते त्रिवार सत्य आहे, असा चिमटा महेंद्र दळवी यांनी अजितदादा पवार आणि सुनील तटकरे यांना काढला.

सुनील तटकरे भाजपच्या वाटेवर?

इकडची बॅग भरली गल्ली टू दिल्ली आता कमळाकडे वाट पकडली आहे. त्यामुळे तटकरे हे भाजपात जातील असे भाकीत महेंद्र दळवी यांनी केले आहे. खरं तर नाव बदनाम करणारी ही व्यक्ती आहे. महाराष्ट्रात कधी कोणी विचारलं तर रोह्याचं नाव सांगू नका अस मला वाटतं, प्रत्येक घोटाळे बास म्हटलं तटकरेचा चेहरा समोर येतो सिंचन घोटाळ्याच्या अगोदर देखील अनेक घोटाळे आहेत कदाचित तुम्हाला माहीत नसतील अशी टीका दळवी यांनी केली.

आता शेवटचा धक्का आपल्याला द्यायचा आहे

आयुष्यभर दुसऱ्यांना धक्का मारणे ही त्यांची संस्कृती आहे. आता शेवटचा धक्का आपल्याला मारायचा आहे. आतापर्यंत त्या व्यक्तीचा प्रवास राजकीय म्हटला तर चीटिंगच असं म्हणता येईल. ज्या नेत्याच्या आश्रय खाली काम करायचे त्यालाच फसवायचा ही संस्कृती आहे. रोह्याचं नाव बदनाम होणे म्हणून या लोकांना हद्दपार करणे काळाची गरज आहे, असे महेंद्र दळवी म्हणाले.

तर अनिकेत तटकरे यांच्यावर टीका करताना काही लोक सोन्याचा चमचा घेऊन आलेले आहेत.त्यामुळे त्यांचे बोल वेगळे आहेत आदर ठेवणे त्यांना जमलंच नाही. त्यांना कोणाचीच पर्वा नसते, असा टोला त्यांनी आदिती आणि अनिकेत तटकरे यांना लगावला आहे.या नवीन आरोपांमुळे कोकणातील वातावरण तापलेले आहे. त्याचा फायदा भाजपला होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.