दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीतून उद्धव ठाकरे यांची सर्वच राजकीय पक्षांना साद; म्हणाले…
उद्धव ठाकरे दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीत दाखल; स्थानिकांशी संवाद साधताना म्हणाले, दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीत मीही जाऊ शकतो पण...

इर्शाळवाडी, रायगड | 20 जुलै 2023 : रायगडमध्ये जिल्ह्यातील खालापूरजवळ गुरूवारी 20 जुलैला दरड कोसळली. या दरडीखाली अख्ख इर्शाळवाडी गाव दबलं गेलं. अशात आज तिसऱ्या दिवशीही तिथं शोध मोहिम सुरू आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इर्शाळवाडी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलंय.
उद्धव ठाकरे यांनी इर्शाळवाडीत जात स्थानिकांशी संवाद साधला. त्यांना धीर दिला. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा शब्द दिला. सोबतच सर्वपक्षीय नेत्यांना त्यांनी एक आवाहन केलं आहे.
दरवर्षी अशा घटना घडत आहे. असं काही घडलं की मग आपण खडबडून जागे होतो. त्यासाठी धावपळ करतो. या घटनेत मी राजकारण करू इच्छित नाही. पण राजकारणी मंडळींसाठी ही लाजीरवाणी बाब आहे. सर्वच पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे. दरड कोसळण्याच्या घटना वारंवार होता कामा नयेत, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मी मुख्यमंत्री असताना मी प्रयत्न करत होतो. अशा दुर्गम आणि धोकादायक भागातील लोकांचं आसपासच्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलं पाहिजे. हे घडायला हवं. एकत्र येऊन अशा भागातील लोकांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
आपण सध्या इर्शाळवाडीच्या पायथ्याशी आहोत. इथून काही अंतरावर इर्शाळवाडी गाव आहे. या गावात दुर्घटनास्थळी जायला मी जाऊ शकतो. पण मी तिथं गेलो की सोबतची माणसं येणार त्यामुळे वरती गर्दी होणार. शोधकार्यात अडथळा येणार. त्यामुळे मी तिथं जाणं टाळतो आहे. NDRF च्या जवानांना त्यांचं काम करू द्या. इथं शोधकार्य लवकरात लवकर पूर्ण होणं आणि लोकांना मदत मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी इर्शाळवाडी या दुर्घटनाग्रस्त ठिकाणी जाणं मी टाळतो आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रात आजही अनेक वाड्या-वस्त्या, गावं डोंगराच्या पायथ्याशी आहेत. तळीये गावातही मी गेलो होते. तेव्हा पाहिलं की होत्याचं नव्हतं झालं होतं. आताही इर्शाळवाडीची तीच अवस्था आहे. लोकांशी बोललो. त्यांच्या वेदनांशी मी सहमत आहे. पण बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. कोणत्या शब्दात त्यांचं सांत्वन करू कळत नाहीये, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
