
मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्यानं होत आहे, दरम्यान आज मुंबईमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मेळावा पार पडला, या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला मतदार याद्याच्या मुद्द्यावरून इशारा दिला आहे. जोपर्यंत मतदार याद्यांमधील घोळ संपत नाही, तोपर्यंत तुम्ही निवडणूक घेऊनच दाखवा असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान राज ठाकरे यांच्या या मेळाव्यानंतर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?
निवडणुकांना समोर जाण्याच्या आधीच हे लोक बोलत आहेत म्हणजे कुस्तीच्या आखाड्यात उतरण्याच्या आधीच पैलवान चितपट होणार आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे किंवा त्यांच्यासोबतचे असणारे पक्ष यांना माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये ते ठणठण असणार आहेत, या आधी राज ठाकरेंचं टन टन टोल झालं, भोंगे झाले त्यानंतर आता ठाकरे फक्त तोंडाची हवा घालत आहेत, असा घणाघात यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना सदावर्ते यांनी म्हटलं की, आज विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बोलत आहेत, त्यांच्याविरोधात नरेटिव्ह सेट करण्याचं काम सुरू आहे, आपल्या सरकारने सगळ्यात योग्य काम केलेलं आहे, शेतकऱ्यांना मदत दिलेली आहे, पण हे लोक रडीचा डाव खेळत आहेत. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी आधीच सांगाव तेलंगणामध्ये आणि बाकीच्या काही राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता आली, तेव्हा त्यांच्यासोबत निवडणूक आयोग होतं का? असा सवाल यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
राज ठाकरे यांच्याकडे आज काय आहे? ते अजित पवारांवर बोलले मात्र अजित पवार यांच्यावर बोलून सुद्धा त्यांना टाळ्या मिळाल्या नाहीत, राज ठाकरे यांची पॉलिटिकल पार्टी डिस्क्रिमनिटीव आहे, ते प्रांतवाद करतात त्याच्या विरोधात आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत, असंही यावेळी सदावर्ते यांनी म्हटलं आहे.