77 सालची दगडफेक ते आज… राज ठाकरेंनी सांगितल्या जुन्या आठवणी, म्हणाले कुठे काय होतं…

तब्बल १९ वर्षांनंतर राज ठाकरे यांनी शिवसेना भवनात पाऊल ठेवले. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (UBT), मनसे आणि राष्ट्रवादी (SP) युतीचा संयुक्त 'वचननामा' आज प्रसिद्ध करण्यात आला, यावेळी राज ठाकरे भावूक झाले होते.

77 सालची दगडफेक ते आज... राज ठाकरेंनी सांगितल्या जुन्या आठवणी, म्हणाले कुठे काय होतं…
raj thackeray at shivsena bhavan
| Updated on: Jan 04, 2026 | 2:12 PM

महाराष्ट्रात सध्या २९ महापालिका निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केल्यानंतर आज राजकारणातील एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी या शिवशक्ती युतीचा संयुक्त वचननामा आज शिवसेना भवनात प्रसिद्ध करण्यात आला. या निमित्ताने राज ठाकरे यांनी तब्बल १९ वर्षांनंतर शिवसेना भवनात पाऊल ठेवले. या सोहळ्यानिमित्त ठाकरे कुटुंबातील भावनिक बंधांचे दर्शनही घडले.

माझ्या सर्व आठवणी त्या जुन्या इमारतीशी जोडलेल्या

तब्बल १९ वर्षांनंतर शिवसेना भवनाचे उंबरठा ओलांडताना राज ठाकरे काहीसे भावूक झाले होते. आपल्या भाषणात त्यांनी भूतकाळातील अनेक प्रसंगांना उजाळा दिला. संजय राऊत वारंवार २० वर्षांचा उल्लेख करत आहेत, मला तर वाटतंय मी जेलमधून सुटून आलोय. हे नवीन सेना भवन मी पहिल्यांदाच नीट बघतोय, कारण माझ्या सर्व आठवणी त्या जुन्या इमारतीशी जोडलेल्या आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.

खूप वर्षांनी सेनाभवनात आलो. नवीन सेना भवन पहिल्यांदाच बघतो. कायमच्या आठवणी या जुन्या शिवसेना भवनाच्या आहेत. आता कुठे काय होतंय समजत नाही. आठवत नाही, असे राज ठाकरे म्हणाले. यावेळी राज ठाकरेंनी १९७७ सालचा संदर्भ दिला. जेव्हा शिवसेना भवन बांधून पूर्ण झाले, तेव्हा राज्यात जनता पक्षाचे वारे होते. त्यावेळच्या सभेनंतर सेना भवनावर दगडफेक झाली होती, त्या संघर्षाच्या काळापासून मी या वास्तूचा साक्षीदार आहे.

आम्ही सर्वांनी मिळून हा वचननामा तयार केलाय

यानंतर उद्ध ठाकरेंनी राज ठाकरेंच्या शिवसेना भवनात येण्याबद्दल प्रतिक्रिया दिली. मी गाडीतून उतरल्यापासून प्रसारमाध्यमे विचारत होती की राज ठाकरेंच्या येण्याकडे कसे पाहता? मी म्हटले, आधी त्यांना येऊ तर द्या. आज सेना भवनात जे चैतन्य दिसत आहे, ते महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाची नांदी आहे. विद्या चव्हाण यांच्यासह आम्ही सर्वांनी मिळून हा वचननामा तयार केला आहे. हे केवळ आश्वासन नाही तर महाराष्ट्राच्या विकासाचा शब्द आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

तरुणांच्या रोजगारावर भर

दरम्यान आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी संयुक्तपणे मांडलेल्या या वचननाम्यात प्रामुख्याने मुंबई आणि इतर २८ महापालिकांमधील नागरी सुविधा, मराठी भाषेचे जतन आणि तरुणांच्या रोजगारावर भर देण्यात आला आहे.