Rohit Arya : रोहित आर्याने मुलांना ओलीस का ठेवलं, धक्कादायक कारण समोर, या बड्या नेत्यासोबत बोलण्याची केली होती मागणी
मुंबईमध्ये आज एक धक्कादायक घटना घडली आहे, या घटनेनं राज्यात खळबळ उडाली आहे, रोहित आर्या नावाच्या व्यक्तीनं पवईमधील एका स्टुडिओमध्ये काही मुलांना ओलीस ठेवलं होतं, या मुलांची सुटका करण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी या व्यक्तीचा एन्काउंटर केला आहे.

आज मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे, या घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे, रोहित आर्या नावाच्या व्यक्तीनं मुंबईतील पवईमध्ये असलेल्या आरे स्टुडिओमध्ये काही मुलांना ओलीस ठेवलं होतं, या घटनेनं मोठा गोंधळ उडाला, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मुलांच्या सुटकेचा प्रयत्न सुरू असताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान रोहित आर्या याने या चिमुकल्यांना डांबून का ठेवलं होतं? त्याची मागणी नेमकी काय होती, त्याचं पोलिसांसोबत नेमकं काय बोलणं झालं? याबाबत आता माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार एपीआय अमोल वाघमारे यांनी रोहित आर्या यांच एन्काउंटर केलं आहे. टॉयलेटच्या खिडकीमार्गे पोलीस पहिल्या माळ्यावर पोहोचले, रोहित आर्याकडे एक एअरगन आणि काही ज्वलनशील पदार्थ होते, आर्या मुलांना धोका पोहोचवेल याची खात्री पोलिसांना होती, त्यामुळे पोलिसांकडून त्याच्यावर गोळीबार करण्यात आला, या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे.
एन्काउंटरच्या आधी जवळपास दोन ते अडीच तास पोलीस त्याच्याशी फोनवरून संपर्कात होते. सुरुवातील माझं शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांच्याशी बोलणं करून द्या, अशी मागणी आरोपीने केली होती, मात्र त्यानंतर त्याने त्यांच्याशी बोलण्यास देखील नकार दिला. रोहित आर्याने आपली नेमकी मागणी काय हे स्पष्टपणे पोलिसांना सांगितले नाही, अशी माहिती समोर येत आहे.
दरम्यान मुंबईच्या बाहेरून आलेली सर्व ग्रामीण भागातील मुलं रोहित आर्याने बंदिस्त करून ठेवली होती. लेट्स चेंज या वेबसिरीजसाठी रोहित आर्याने ऑडिशन ठेवले होते. आज चित्रिकरण आहे असे सांगून त्याने मुलांना स्टुडिओमध्ये बोलावलं होतं, ऑडिशनसाठी तब्बल 100 मलं आली होती, त्यानंतर त्याने त्यातील 80 मुलांना घरी पाठवलं आणि उर्वरीत मुलांना डांबून ठेवलं होतं. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातून ही मुले ऑडिशनसाठी मुंबईत आली होती. पोलिसानी झाडलेली गोळी रोहित आर्याच्या छातीत लागल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती आता समोर आली आहे.
