Rohit Pawar : मी अन् नाराज ? राष्ट्रवादीच्या महत्वाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्यावर रोहित पवारांची पोस्ट चर्चेत ..
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाच्या बैठकीला रोहित पवारांच्या अनुपस्थितीमुळे नाराजीच्या चर्चांना उधाण आले. सुनील तटकरे-प्रफुल पटेल यांच्या भेटीमुळे ते नाराज असल्याची अटकळ होती. मात्र, रोहित पवारांनी 'X' वरून स्पष्ट केले की, कुकडी आणि बारामतीतील पाणी प्रश्नामुळे त्यांना पुण्यात थांबावे लागले. त्यांनी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच काम करणार असल्याचे सांगत, सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत असून आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मुंबईत बैठक पार पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्ष चांगलेच चर्चेत असून आधी अजित पवार गटातील नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे नाराज होते, अशा चर्चा होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. मात्र यामुळे शरद पवार गटात कुरबूर सुरू झाली. तटकरे आणि पटेल यांच्या भेटीमुळे शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यातच ते आज पक्षाच्या मुंबईतील बैठकीलाही अनुपस्थित असल्यामुळे नाराजच्या चर्चांना आणखीनच उधाण आलं. मुंबईला न जाता ते पुण्यात असल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि चर्चा आणखीनच रंगली.
मात्र आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळताना दिसतोय, कारण खुद्द रोहित पवार यांनीच आपलं मौन सोडत या संपूर्ण मुद्यावर भाष्य केलं आहे. रोहित पवार यांनी ‘X’ वरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून (पूर्वीचं ट्विटर) एक पोस्ट लिहीत लांबलचक स्पष्टीकरण दिलं आहे. नाराजीच्या बातम्या निराधार असल्याचं त्यांनी या पोस्टमधून स्पष्ट केलं आहे. तसेच आपण शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करणार असल्याचं त्यांनी यातून नमूद केलं आहे.
काय आहे रोहित पवार यांची पोस्ट ?
“मी नाराज असल्याच्या काही चॅनेलवर सुरु असलेल्या बातम्या या निराधार आहेत. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काल काम करणारे आम्ही कार्यकर्ते होतो आणि आजही आहोत. पण माझ्या मतदारसंघातील कुकडी आणि बारामतीतील शेतकऱ्यांसाठी जनाई-शिरसाईच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने तो सोडवण्यासाठी अचानक सिंचन भवनमध्ये यावं लागलं… कदाचित प्रशासनावर दबाव नसता आणि पाणी सोडण्याचा शब्द त्यांनी पाळला असता तर आज मला पुण्यात सिंचन भवनात येण्याऐवजी मुंबईतील पूर्वनियोजित बैठकीला हजर राहता आलं असतं ” असं रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहीलं आहे.
“एक मात्र खरंय, की आज राज्यातील शेतकरी आणि सामान्य माणूस हा मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे आणि त्याच्यासाठी निःसंदिग्धपणे ठोस भूमिका घेण्याची आणि रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची गरज आहे. पक्ष आणि वरिष्ठ नेते याबाबत आज योग्य निर्णय घेतील, असा विश्वास आहे” असंही रोहित पवार यांनी पोस्टमध्ये लिहीलं. त्यांच्या या पोस्टमुळे आता नाराजीच्या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळालाय असं दिसतंय.
मी नाराज असल्याच्या काही चॅनेलवर सुरु असलेल्या बातम्या या निराधार आहेत. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काल काम करणारे आम्ही कार्यकर्ते होतो आणि आजही आहोत. पण माझ्या मतदारसंघातील कुकडी आणि बारामतीतील शेतकऱ्यांसाठी जनाई-शिरसाईच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने तो…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 20, 2026